दर्यापुरात प्रेमप्रकरणातून अपहरण अन् बलात्कार
By admin | Published: November 13, 2015 12:24 AM2015-11-13T00:24:47+5:302015-11-13T00:24:47+5:30
आधी प्रेम केले. त्यानंतर दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या अल्पवयीन प्रेयसीचे तिच्याच सहमतीने अपहरण केले.
रमाबाईनगरातील घटना : आरोपीची दिवाळी कोठडीत
दर्यापूर : आधी प्रेम केले. त्यानंतर दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या अल्पवयीन प्रेयसीचे तिच्याच सहमतीने अपहरण केले. पश्चात तिच्यावर दर्यापूर व लाखपुरी येथे दोनदा बलात्कार झाल्याची घटना घडली. आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
योगेश दीपक इंगळे (१९, रा. शिवाजीनगर बनोसा) असे आरोपीचे नाव असून त्याचे येथीलच रमाबाईनगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. १५ वर्षांची ही अल्पवयीन विद्यार्थिनी व तिची चार वर्षांची मावस बहीण शाळेत शिष्यवृत्तीचे पैसे घेण्यासाठी येथीलच अकोट मार्गाजवळील एका शाळेत ७ नोव्हेंबरला सकाळी गेल्याचे समजते. येथूनच आरोपी त्या मुलीला यवतमाळ जिल्ह्यातील खेरडा येथे घेऊन गेला. घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी केल्यावरून लाखपुरीमार्गे दर्यापूरला आल्यानंतर येथील एका वीटभट्टीवर काम करीत असताना पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली. सदर युवकावर कारवाई करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मुलीची बालसुधारगृहात रवानगी
दर्यापूर : सात नोव्हेंबर रोजी अपहरण झाल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सदर मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु चार वर्षाची मुलगीही अल्पवयीन मुलीसह निघून गेल्याने पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.
आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध ३६६, ३७६, २८६ भादंवि व आरडब्ल्यू ४, ८ तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी योगेश हा मोलमजुरीचे ट्रॅक्टरवर काम करतो. त्याने यवतमाळ जिल्ह्यातही काही काळ काम केले आहे. त्यामुळेच सदर अल्पवयीन मुलीला त्याने तेथे नेले असल्याची परिसरात चर्चा आहे.
पुढील तपास दर्यापूर ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक संजयसिंह बिस्ती हे करीत आहेत. सदर मुलीचे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिला अमरावती येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. दर्यापूर तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
(प्रतिनिधी)