अब्दुल सत्तारांनी मन जिंकलं...मेळघाटात ज्या घरात थांबले तिथं छप्पर गळती, २ घरं देण्याची घोषणा अन् आजच भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:20 AM2022-09-01T11:20:03+5:302022-09-01T11:21:17+5:30
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या हटके स्टाइल भाषणानं भुरळ पाडणारे अब्दुल सत्तार यांची आता मेळघाटातही हवा झाली आहे.
अमरावती-
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या हटके स्टाइल भाषणानं भुरळ पाडणारे अब्दुल सत्तार यांची आता मेळघाटातही हवा झाली आहे. राज्याच्या कृषीमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यांनी बुधवारी केलेल्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे. अब्दुल सत्तार यांनी मेळघाटात एका शेतकऱ्याच्या घरी अगदी साधेपणाने रात्रभर मुक्काम केला. तिथंच जेवणंही केलं. शेतकऱ्याच्या घराची परिस्थिती पाहून अब्दुल सत्तार यांना भरुन आलं.
सत्तार यांनी ज्या घरात रात्रीचा मुक्काम केला. त्या घराच्या छप्पराला पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली होती. अब्दुल सत्तारांना शेतकऱ्याची अशी अवस्था पाहावली नाही आणि त्यांनी लागलीच माझ्याकडून या शेतकऱ्यांना दोन चांगली घरं बांधून द्या असे आदेशच सहकाऱ्यांना दिला.
अब्दुल सत्तारांनी आदेश दिले आणि दुसऱ्या दिवशी लगेच जमिनीचं मोजमाप सुरू झालं. आजचं त्या शेतकऱ्याच्या नव्या घराच्या कामाचं भूमिपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं.
अब्दुल सत्तार यांनी मेळघाटातील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी पाहुणचार घेतला. तर सुनील धांडे यांच्या घरी रात्रीचा मुक्काम केला. तसंच शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेच दोघांनाही नवं घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आज सकाळी सत्तारांनी भूमिपूजनाचीही घोषणा केली. इतकंच नव्हे, तर त्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नालाही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.
'माझा एक दिवस बळीराजासाठी' या अंतर्गत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा सुरू आहे. बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी या गावात पोहोचले. चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला.