महिला डॉक्टरने केला इच्छेविरुद्ध गर्भपात
By admin | Published: January 21, 2017 12:01 AM2017-01-21T00:01:19+5:302017-01-21T00:01:19+5:30
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा जबरीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी शिवशक्ती कॉलनीत उघडकीस आली.
पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा : शारीरिक-मानसिक छळ, शिवशक्ती कॉलनीतील घटना
अमरावती : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा जबरीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी शिवशक्ती कॉलनीत उघडकीस आली. विवाहितेच्या पतीने महिला डॉक्टरशी संगनमत करून तिच्या ईच्छेविरूद्ध गर्भपात केल्याचा गुन्हा राजापेठ पोलिसांनी गुरूवारी नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, विनित रामचंद्र नाईक, रामचंद्र उपासराव नाईक व दोन महिला (रा. शिवशक्ती कॉलनी) व प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू (रा. स्वस्तीक नगर) अशी आरोपींची नावे आहेत. अमरावतीमधील एका तरुणीचा शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी विनित रामचंद्र नाईक याच्याशी दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस सगळे सुरळीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी विवाहितेचे सोन्याचे दागिने कपाटातून चोरीला गेले होते. त्यावेळी तिने सासरच्या मंडळींवर संशय घेतला होता. या अपमानाचा सल मनात ठेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला होता. दरम्यानच्या काळात ती गर्भवती झाली.
तिच्यावर स्वस्तिकनगरातील प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सासरच्या मंडळींनी गर्भार अवस्थेत तिचा शारीरिक, मानसिक छळ करून गर्भपाताच्या उद्देशाने गोळ्याही दिल्यात. परिणामी तिची प्रकृती बिघडली. रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिला प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपी विनित नाईक याने डॉक्टरांना हाताशी धरून पत्नीच्या इच्छेविरूद्ध गर्भपात करून घेतल्याचे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. याघटनेची तक्रार पीडितेने राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली असून पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३१३, ४९८(अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा प्राथमिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
पीडित महिलेचा शारिरिक व मानसिक छळ करून तिच्या इच्छेविरूद्ध गर्भपात केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या मंडळींसह महिला डॉक्टरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेच्या गर्भपातप्रक्रियेचे सर्व दस्तेऐवज महिला डॉक्टरकडून मागविण्यात आले आहेत.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.
दाम्पत्य काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य गर्भपात करण्यासाठी आले होते. मात्र, मी नकार दिला होता. काही दिवसानंतर ती महिला रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत रुग्णालयात आली. तिची स्थिती नाजूक असल्यामुळे मी तिला दाखल करून घेतले.
- वासंती कडू, प्रसुतीतज्ज्ञ,