सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:39+5:302021-05-29T04:11:39+5:30
कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने ...
कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव
चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून, देशाच्या उंबरठ्यावर आला असल्याची वर्दी दिली. परिणामी खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू शकतो, असे भाकीत राज्याच्या कृषी विभागाकडून आधीच वर्तविण्यात आले होते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते.
गतवर्षी सोयाबीनचे पीक, सप्टेंबर- ऑक्टोबरच्या पावसाने खराब झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात सोयाबीन बियाण्यांची चणचण भासणार हे शेतकऱ्यांनी आधीच ताडले होते. अशातच मार्चपासून बाजारात सोयाबीनच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या खरिपात सोयाबीन पीकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पेरणीसाठी सोयाबीन बियाणे खरेदी करायला सुरुवात केली आहे.
५० टक्के शेतकऱ्यांचा प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. ५० टक्के शेतकरी घरगुती चांगले बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सोयाबीन बियाण्यांत झालेली दरवाढ हे मुख्य कारण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यावर्षी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतीकिलो १३५ रुपये ते १६५ रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध सोयाबीन बियाणे वाण निहाय, ३० किलोच्या बॅगला चार हजार रुपयेप्रमाणे दर आहेत. मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या २३ किलो २५ किलो व २७ किलोच्या बॅगला चार हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.
मान्सूचा पाऊस सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आताच सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. गतवर्षी याच बियाण्यांचे दर, प्रती बॅग पंधराशे ते दोन हजार या दरम्यान होते. अनेक शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यावेळी घरगुती सोयाबीन बियाणे दर, हा सात हजार रुपये प्रतीक्विंटल होता. मे महिन्यात हाच दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतीक्विंटल झाला आहे. तरीही तो कंपन्यांच्या बियाणेपेक्षा कमीच आहे. यासाठीच शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्यांकडे वळले आहेत. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अटकेपार जाऊन घरगुती सोयाबीन बियाण्याची खरेदी केली आहे.
जालना, सांगली, परभणी, औरंगाबाद, बुलडाणा येथून सामूहिक जाऊन घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी करून आणले आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तालुक्यासाठी सोयाबीनचे, १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाल्यास तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.