शिक्षणाचा बट्ट्याबोळ, १९ शाळांची पटसंख्या पन्नाशीच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:01 PM2018-09-15T22:01:17+5:302018-09-15T22:01:57+5:30
महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.
शिक्षण विभागानुसार, शहरात महापालिकेच्या ६४ शाळा आहेत. त्यात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. पैकी अंबिकानगर येथील हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १२ मध्ये पहिली ते पाचवी या वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे ती शाळा बंद करण्यात येणार आहे. जमील कॉलनी येथील मनपा उर्दू माध्यमिक शाळेत केवळ आठवीतच विद्यार्थी असल्याने ही शाळा दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १९ शाळांमध्ये सरासरी ३ ते ४८ विद्यार्थी संख्या असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पटसंख्येचे हे वास्तव मांडून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा महापालिका शाळांमधील काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. घटत्या पटसंख्येसंदर्भात शिक्षण विभागाने करावयाच्या उपाययोजना व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी गतवर्षी विशेष आमसभेची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशेष आमसभेत शिक्षण विभागावर चर्चा झाल्यास लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीने ती आमसभा घेण्यास प्रशासनाने नकार दिला. मात्र, यंदाही महापालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्येत झपाट्याने घट झाल्याने आयुक्त संजय निपाणे यांनी पुढाकार घेऊन विशेष आमसभा बोलवावी, असा सूर उमटला आहे.
एकूण ८७०८ विद्यार्थी
महापालिकेच्या एकूण ६४ शाळांमध्ये ८७०८ विद्यार्थी आहेत. त्यात पहिलीत १११९, दुसरी व तिसरीत प्रत्येकी १२०३, इयत्ता चौथीत १२६५ व पाचवीत १२१३ असे पाच वर्ग मिळून ६००३ विद्यार्थी आहेत. इयत्ता सहावीत ९२३, सातवीत ९०९ व आठवीत ८७३ विद्यार्थी असल्याची नोंद महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे.