पीआरसीच्या पत्रपरिषदेला आमदारांची अनुपस्थिती
By Admin | Published: November 8, 2015 12:15 AM2015-11-08T00:15:38+5:302015-11-08T00:15:38+5:30
गेली दोन दिवस जिल्हा परिषदेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पंचायतराज समितीच्या प्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमरावती : गेली दोन दिवस जिल्हा परिषदेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पंचायतराज समितीच्या प्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र या पत्रपरिषदेला समितीमधील एकाही आमदाराने उपस्थिती लावली नाही. समितीप्रमुख संभाजी निलंगेकर पाटील यांनी पत्रपरिषदेदरम्यान अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत आढळून आलेल्या अनियमिततेवर बोट ठेवले. पीआरसी दोन दिवसांच्या पाहणीदरम्यान काय आढळले, याचा गोषवारा निलंगेकर पाटलांकडून दिला गेला.
यावेळी पंचायतराज समिती पीआरसीच्या सदस्यांऐवजी शहर भाजपचे अध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे महापालिकेतील गटनेते संजय अग्रवाल आणि भाजयुमोचे प्रदेश पदाधिकारी प्रताप अडसड यांची उपस्थिती होती. संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे प्रदेश महामंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे पीआरसीसंदर्भात माध्यमांशी बोलताना ते महामंत्री म्हणून की पीआरसीचे प्रमुख म्हणून माध्यमांना सामोरे गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे २५ सदस्यीय पंचायत राज समितीच्या प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अन्य १२ आमदार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र परिषदेला निलंगेकर वगळता अन्य एकाही आमदारांची उपस्थिती नव्हती.
पत्रपरिषदेदरम्यान निलंगेकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आतापर्यंत समितीप्रमुख म्हणून आपण ६ जिल्हा परिषदांचा धांडोळा घेतला. त्यात अमरावती जिल्हा परिषदेचे कामकाज ढेपाळले असल्याचे ते म्हणाले.
पंचायत राज समितीला ज्या अनियमितता आढळल्या त्या निलंगेकर यांनी विशद केला. फक्त सांख्यिकी दिले नाही. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान ‘गोपनियता’ कशी राहिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून पंचायतराज समितीत भाजपच्या अधिकाधिक आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे विधिमंडळात अहवाल देण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील अनियमितता माध्यमांसमोर उघड करण्याचा मोह निलंगेकर पाटलांना आवरता आला नाही, अशी चर्चा शनिवारी जि.प. वर्तुळात होती. पत्रपरिषदेचे शुल्कसुद्धा भाजपचे शहर अध्यक्ष तुषार भारतीय यांनी चुकविले त्यामुळे ही पत्रपरिषद निलंगेकर पाटलांनी भाजपचा महामंत्री म्हणून घेतली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाजपचा महामंत्री म्हणून पत्रकार परिषद घेतली असल्यास भारतीय, अग्रवाल आणि अडसडांची उपस्थिती समर्थनीय ठरते. मात्र त्यात पीआरसी प्रमुख म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची केलेली चिरफाड संभ्रमात टाकणारी आहे. (प्रतिनिधी)