असे झाले सपकाळ प्रभारी कुलगुरू

By admin | Published: February 24, 2016 12:15 AM2016-02-24T00:15:09+5:302016-02-24T00:15:09+5:30

केमिकल टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख विलास सपकाळ यांच्या नावावर ‘प्रभारी कुलगुरू’ म्हणून सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब झाले.

In the absence of the Vice Chancellor Chancellor | असे झाले सपकाळ प्रभारी कुलगुरू

असे झाले सपकाळ प्रभारी कुलगुरू

Next

अमरावती विद्यापीठ : दिवसभर चालला खल
अमरावती : केमिकल टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख विलास सपकाळ यांच्या नावावर ‘प्रभारी कुलगुरू’ म्हणून सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी सोमवारी दिवसभर प्रभारी पदावर खल झाला. राजभवनातील उच्चस्तरीय सूत्रे वेगाने फिरली. दुपारपर्यंत वेगवान घडामोडी झाल्यात आणि कुलपती कार्यालयाकडून सायंकाळी ५.३० च्या सुमारास सपकाळांच्या नावे सुधारित आदेश जारी झालेत. अधिकृत फॅक्स आल्यानंतर या ‘प्रभारी’ नाट्यावर पडदा पडला आणि विभागीय आयुक्तांचे प्रभारी कुलगुरुपद औटघटकेचेच ठरले.
१८ फेब्रुवारीलाच महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या नावे कुलपतींनी आदेश जारी केले होते. खेडकरांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कुलगुरुपदाचा प्रभार सांभाळावा, असे ते आदेश होते. विभागीय आयुक्त राजूरकरांना हे आदेश मिळालेत. मात्र, हा आदेश सार्वजनिक झाल्यानंतर २२ फेब्रुवारीला राजूरकरांऐवजी विलास सपकाळ यांच्या नावे सुधारित आदेश काढण्यात आला. तत्पूर्वी विरोधाच्या भावना राजभवनापर्यंत पोहोचविण्यात आल्या.
३१ मार्च २०१४ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कुलगुरुपदाचा कार्यभार तत्कालीन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तेथील सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सन २००९ च्या निर्देशानुसार कुलगुरुपदाचा कार्यभार विभागीय आयुक्तांकडे न देता या पदाची पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस द्यावा, अशा आशयाची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. दरम्यानच्या काळात शुक्रवार १० आॅक्टोबर २०१४ ला राज्यपालांनी प्रभारी कुलगुरुपदावर अनुपकुमार ऐवजी नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी प्र-कुलगुरु विनायक देशपांडे यांची नियुक्तिी केली होती. तो संदर्भ लक्षात घेऊन सपकाळांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

न्यायालयीन ससेमिरा टाळण्यासाठीच निर्णय

नागपूर विद्यापीठाप्रमाणे अमरावती येथे विभागीय आयुक्त राजूरकरांच्या नियुक्तीविरोधात अमरावती विद्यापीठाशी संबंधित प्राध्यापक वा एखादी विद्यार्थी संघटना उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते, ही बाब जाणीवपूर्वक कुलपती कार्यालयाकडे पोहोचविण्यात आली. त्यानंतर उच्चपातळीवर बराच खल झाला आणि विभागीय आयुक्त राजुरकर यांच्या नावे काढलेला आदेश मागे घेत कुलगुरुपदाचा अनुभव असलेल्या विलास सपकाळ यांना प्रभारी कुलगुरू म्हणून प्राधान्य देण्यात आले. न्यायालयीन दावे-प्रतिदावे नकोत, म्हणून कुलपती कार्यालयाने विभागीय आयुक्तांऐवजी सपकाळांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

Web Title: In the absence of the Vice Chancellor Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.