राणा दाम्पत्याचे बेताल वक्तव्य ; १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार?, ठाकूर यांची रोखठोक भूमिका
By गणेश वासनिक | Published: September 14, 2023 05:47 PM2023-09-14T17:47:08+5:302023-09-14T17:49:07+5:30
जात कोणती, पक्ष कोणता हे अगोदर राणांनी सिद्ध करावे - यशोमती ठाकूर
अमरावती : मागीलअर्थात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी राणा यांच्याकडून कडक नोटा घेऊन विरोधकांचा प्रचार केला असा खोटा, बिनबुडाचा आरोप करणाऱ्या राणा यांनी हा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात आपण १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
आमदार यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या, ही अतिशय घाणेरडी माणसं आहेत. त्यांनी जात चोरली ही वस्तुस्थिती आहे, ते जात चोर आहेत, हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात घाण पसरवण्याचे काम केले आहे. त्यांची लायकी तरी काय आहे. मी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि दुसऱ्याचा प्रचार केला हे त्यांनी सिद्ध करावे. चित्रपट नट-नट्यांना कार्यक्रमात आणायचे. त्यांना नाचवायचं हेच उद्योग त्यांनी आजवर केले आहेत. खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी त्यांची नेमकी जात कोणती? त्यांचा नेमका पक्ष कोणता? हे त्यांनी जाहीर करावे, असा सवाल ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
कॅमेरापुढे खोटा- खोटा अभिनय करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणंही गैर आहे, असा उपरोधिक सवाल करून त्या म्हणाल्या की, जात प्रमाणपत्र खरं की खोटं हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना व निवडणुकीत जास्त खर्च केल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सुरू असताना त्यांना नेमका आशीर्वाद कुणाचा? आणि भाजप त्यांना का पाठीशी घालतेय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या मतदारसंघात जाऊन आपण खरे बोललो हा घाव राणा दाम्पत्याच्या जिव्हारी लागला. म्हणूनच हा राजकीय पोटशूळ उठला आहे. म्हणूनच ते अशी घाणेरडी गरळ ओकत आहेत, अशी टीका आमदार ठाकूर यांनी यावेळी केली.
अब्रुनुकसानीबाबत अद्यापर्यंत कोणतीही नोटीस किंवा कायदेशीर कागदपत्र मिळाले नाही. आल्यानंतर कायदेशीर उत्तर दिले जाईल. जे खरे आहे ते खरे आहेच, त्यात काडीमात्रही खोटे नाही.
- रवी राणा, आमदार