प्राणवायू मुबलक, एकाचाही अभावाने जाणार नाही प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:00:56+5:30
पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही. पीडीएमसी ही सेवाभावी संस्था असल्याने त्यांनी सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. येथे एमआरआय मशीनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मैत्री या सेवाभावी संस्थेचे त्यांनी कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आता विदर्भ सज्ज आहे. प्राणवायू न मिळाल्याने एकाही रुग्णाचा प्राण जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे प्राण जात होते. अशावेळी तातडीने विमानतळावर रिकामे टँकर पाठवून विशाखापट्टणम व भुवनेश्वर येथील पोलाद प्रकल्पातून वैद्यकीय प्राणवायू (मेडिकल ऑक्सिजन) विदर्भात आणला, अशी आठवण त्यांनी करून दिली.
व्यासपीठावर पालकमंत्री यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, सुलभा खोडके, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, किरण सरनाईक, दादाराव केचे यांच्यासह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तीनही उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही. पीडीएमसी ही सेवाभावी संस्था असल्याने त्यांनी सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. येथे एमआरआय मशीनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मैत्री या सेवाभावी संस्थेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर व हर्षवर्धन देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, ॲड. गजानन पुंडकर, सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे, स्वीकृत सदस्य महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, पीएस वायाळ, अमोल महल्ले, पीडीएमसीचे डीन डॉ. अनिल देशमुख, संचालक पद्माकर सोमवंशी उपस्थित होते.
मी पैसे खात नाही
मी मंत्रालयात पैसे खात नाही व मला पार्टी चालवायची नसल्यामुळे माझ्याकडे ते काम नाही. मात्र, माझ्याकडे काही सेवाभावी संस्था आल्या, तर त्यांना मी व्हेंटिलेटर सुविधा हॉस्पिटलला पुरवा, असा सल्ला दिला, असे मिश्किलपणे ना. गडकरी यांनी सांगताच खसखस पिकली.
गडकरी साहेबांचे लक्ष ‘घड्याळा’कडे?
ना. नितीन गडकरी घड्याळाकडे सतत लक्ष देत आहे, हे मी पाहत आहे. माझेही घड्याळावरच लक्ष आहे, असे हर्षवर्धन देशमुख आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर सभागृहात हास्यस्फोट झाला. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे गडकरी असे करीत आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत.