गांधींजींच्या काठीवर अभाविपचा झेंडा, हा कुणाचा फंडा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 10:45 AM2023-03-03T10:45:42+5:302023-03-03T10:47:50+5:30
आरोप-प्रत्यारोपांमुळे अमरावतीत राजकीय वातावरण भंग
अमरावती : शहरातील जयस्तंभ चौक परिसर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्याच्या काठीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला. हा प्रकार राष्ट्रपितांचा अपमान असून पुतळ्याची विटंबना असल्याचे युवक कॉँग्रेसचे म्हणने आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही सीसीटीव्ही फुटेज तपासून झेंडा लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे झेंडा लावला कुणी? असा प्रश्न उपस्थित होत असून, सध्या पुतळ्यावरून राजकीय आरोप, प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे.
जयस्तंभ चौक परिसरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हातात काठी असलेला पूर्णाकृती पुतळा आहे. शहरातील अनेक आंदोलनाची सुरवात याच पुतळ्यापासून केली जातात. बुधवारी या पुतळ्याच्या हातात असलेला काठीला काही समाजकंटकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावल्याचे कॉँग्रेसचे समीज जवंजाळ यांनी निदर्शनास आणून दिले होते. यानंतर युवक कॉँग्रेसने पुतळा परिसराची स्वच्छता करुन तो झेंडा काढत, याठिकाणी ठिय्या आंदोलन करुन, झेंडा लावणाऱ्या संमाजकंटकावर कारवाईची मागणी केली. अशातच आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही सीटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे निवेदन देत सदर घटनेचा निषेध केला आहे.
विद्यार्थी परिषदेच्या म्हणन्यानूसार काठीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा हा कोणीतरी अज्ञात व्यक्तिने लावला असून, यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही केली आहे. त्यामुळे पुतळ्याची विंटबना करणारा मूळ सूत्रधार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.