विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:30 PM2019-06-30T22:30:24+5:302019-06-30T22:30:46+5:30
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शनिवारी विद्यापीठातील संपूर्ण कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्यापीठासमोर धरणे देखील दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शनिवारी विद्यापीठातील संपूर्ण कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्यापीठासमोर धरणे देखील दिले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी आंदोलनाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच मुख्यमंत्र्यांसमोर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
मागील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या आंदोलनात शनिवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप कर्मचाºयांनी पुकारला होता. यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांसह विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी देखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले होते. गत आठडवड्यात राज्यभरातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने यांची भेट घेून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ जुलैपासून कर्मचाºयांनी बेमुदत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी विद्यापीठातील कामकाज बंद करून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. त्यावेळी खासदार राणा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असला तरीही आपण आमदार रवी राणा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन विद्यापीठ कर्मचाºयांच्या समस्या त्यांना समजावून सांगू व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन खा. नवनीत राणा यांनी दिले. यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे, सचिव विलास नांदूरकर, शशीकांत रोडे आदींसह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या त्यांच्यासमक्ष मांडल्या.
१५ जुलैपासून बेमुदत संप
विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले असून शनिवारी राज्यभरातील अकृषक विद्यापीठातील कर्मचारी एकाच वेळी लाक्षणिक संपावर आहेत. सरकारने १५ जुलैपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास १५ जुलैपासून राज्यातील सर्व विद्यापीठातील कामकाज बंद पडेल. कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा ठणठणीत इशारा विद्यापीठ कर्मचाºयांनी दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेचे केंद्र असलेल्या विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास विद्यापीठे बंद पडून सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला आक्रमकतेचे स्वरूप देण्यासाठी रणनिती आखली आहे.