एकाच दिवशी दोन ट्रॅप; महावितरण अभियंता, लिपिकास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 01:40 PM2021-12-30T13:40:57+5:302021-12-30T13:48:38+5:30
बुधवारी महावितरणचा कनिष्ठ अभियंता व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना अमरावती एसीबीच्या टीमने रंगेहाथ पकडले.
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी महावितरणचा कनिष्ठ अभियंता व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान एका खासगी इसमालादेखील ताब्यात घेण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव फाटा व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात २९ डिसेंबर रोजी एसीबीने हे दोन्ही सापळे यशस्वी केले.
शिवणी रसूलपूर येथील एका शेतकऱ्याला साखळी नदीतून पाणीपुरवठ्यासाठी वीजजोडणी हवी होती. त्यासाठी नांदगाव खंडेश्वर उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता प्रतीक साहेबराव ढवळे (२८) व खासगी इसम प्रशांत नरोडे (२९, शिवणी रसलापूर) यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १८ हजारांवर व्यवहार निशिचत झाला. २९ डिसेंबर रोजी दुपारी ११.५० ते १२.०५ च्या दरम्यान नांदगाव खंडेश्वर मार्गावरील फुबगाव फाट्याजवळ प्रशांत नरोडे याने स्वत:करिता व ढवळे यांच्यासाठी १८ हजार रुपये स्वीकारले. त्यांना अमरावती एसीबीच्या टीमने रंगेहाथ पकडले. दोन्ही कारवाई एसीबीचे अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या.
बक्षीसपत्राची परवानगी, ३० हजार स्वीकारले
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील वरिष्ठ लिपिक विजय मनोहर बसवनाथे (५७, सुंदरलाल चौक, कॅम्प अमरावती) याला २९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते १.१५ च्या सुमारास १५ हजार रुपये चलनी व १५ हजार रुपये डमी नोटा लाच म्हणून स्वीकारले. त्याला एसीबीने रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचे बक्षीसपत्र करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसुधार विभागात दिला. तो परवानगी आदेश देण्याकरिता बसवनाथे याने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. बुधवारी ती स्वीकारताना त्याला जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ताब्यात घेण्यात आले.