अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती प्रक्रियेला वेग द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:17+5:302021-06-23T04:10:17+5:30
अमरावती : शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शी ...
अमरावती : शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शी व गतीने पूर्ण होण्यासाठी याबाबतच्या अद्ययावत माहितीची आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.
विविध विभागांत अनुकंपा तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीबाबत आढावा ना. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयाचे उपायुक्त नितीन तायडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक भुते, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रमेश गित्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिक्षा यादीनुसार पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्व विभागांतील रिक्त पदांची माहिती, प्रतीक्षा सूची अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करावे व प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.