ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:11+5:302020-12-22T04:13:11+5:30
चांदूर बाजार : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजताच ग्रामीण भागात मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. ...
चांदूर बाजार : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजताच ग्रामीण भागात मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामुळे ग्रामीण भागात गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.
ग्रामपंचायत ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असून, येथूनच पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात होते. चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्वसुद्धा वाढले आहे. त्यामुळे यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे. ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो. यामुळे गावागावांत निवडणुकीचा रणसंग्राम दिसून येणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप दिसून येईल, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत जोरदार चढाओढ दिसून येणार आहे.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिलमध्ये संपली होती. मात्र, या कालावधीत राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा कहर असल्याने या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर डोळा
निवडणुकानंतर लगेच कृषिउत्पन्न बाजार समिती व एक वर्षानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत.