शिक्षण, बांधकाम सभापतीसाठी राजकीय घडोमाडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:08+5:302021-03-19T04:13:08+5:30
अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपद रिक्त झाल्याने निवडणूक येत्या शनिवारी होणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय ...
अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपद रिक्त झाल्याने निवडणूक येत्या शनिवारी होणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समिती सभापती प्रियंका दगडकर यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या विषय समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया २० मार्च रोजी पार पडणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ८ मार्च रोजी निवडणुकी संदर्भातील कार्यक्रम जाहीर केला आहे.
विषयी समिती सभापती पद १९ जानेवारीपासून रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९० नुसार विषय समिती सभापती अधिकारपद नैमत्तिकरीत्या रिकामे झाल्याने विषय सभापती क्र.३ हे पद कलम ८३ (१-अ) मधील तरतुदीच्या अनुषंगाने झेडपीच्या विशेष सभा बोलवून भरले जाणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरावतीचे एसडीओ उदय राजपूत यांची नियुक्ती केलेली आहे. यासोबत सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष काकडे यांचीही निवड केली आहे. त्यानुसार येत्या २० मार्च रोजी वरील विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून नवीन सभापतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. याकरिता आपसात बैठकी सुरू झाल्या असून नवीन शिक्षण व बांधकाम सभापती कोणाला करायचे याबाबत राजकीय खलबते सुरू आहेत.
बॉक्स
धामणगाव रेल्वे तालुक्यात जाणार पद
जिल्हा परिषदेच्या दिवंगत सभापती प्रियंका दगडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेले शिक्षण व बांधकाम सभापती पदावर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातीलच झेडपी सदस्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. नवीन सभापती पदावर कुणाला विराजमान करायचे याचा अंतिम निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदी काँग्रेस नेते घेणार आहेत. ही निवडणूकही बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.