गुन्हेगार आश्रमाशी परिचित
By admin | Published: August 12, 2016 12:12 AM2016-08-12T00:12:21+5:302016-08-12T00:12:21+5:30
सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत.
अमरावती : सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत. ज्याच्या मनावर गुन्हेगारीचा खोलवर पगडा असेल, गुन्हेगारीच्या छटा ज्याला परिचित असतील, अशा व्यक्तिने हे वार केलेले असावेत, असे मत मानसतज्ज्ञांचे आहे. मानेवर वार करणे सहजसाध्य प्रक्रिया नाही. या हल्ल्यात त्यामुळेच एकापेक्षा अधिक हल्लेखोर सहभागी असण्याची शक्यता अधिक आहे. कुणी मान चिरत असेल आणि ती चिरू दिली जाईल, असे अशक्यच आहे. संपूर्ण ताकदीनिशी तो प्रतिकार करणारच. सारीच शक्ती एकवटून केलेला त्याचा तो प्रतिकार रोखण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तिंची गरज आहे. प्रथमेशवर गुदरलेल्या प्रसंगातही शक्तीशाली आणि खुनशी मानसिकतेच्या एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहेच.
हे देखील तपासावे
मुलामुलांच्या टोळ्या असणे. कुठल्याशा मुद्यावरून त्यांच्यात संघर्ष असणे. वारंवार त्यासाठी खटके उडणे आणि दोन टोळ्यांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे कुठल्या एका बधिर क्षणाला असा गुन्हा घडण्याची शक्यता असू शकते.
मुलांना भोजन देण्यासाठी, त्यांच्या देखरेखीच्या कामासाठी काही युवक आश्रमपरिसरातच वास्तव्याला आहेत. ही मुले पिंपळखुटा वा परिसरातील असल्यामुळे आणि प्रथमेशपेक्षा वयाने मोठी असल्यामुळे त्यांचा या प्रथमेशसम मुलांवर धाक ठेवण्याचा प्रकारही नजरेआड घालता येणार नाही. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाने पिंपळखुट्यातील स्थायी मुले बलवान झाल्याने शिक्षणासाठी येणाऱ्या ‘पाहुण्या’ मुलांवर ते हुकूमत गाजवू शकतात. न जुमानणाऱ्या मुलांना धडा शिकिवण्याच्या मानसिकतेतून असे अतिरेकी गुन्हेगारी कृत्य घडू शकते.
घडलेला प्रकार बांधकाम सुरू असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी घडला आहे. अर्थात आडोशाला घडलेला आहे. सुटीच्या दिवशी आणि सहज कुणाचे लक्ष जाणार नाही, अशी जागा हल्ल्यासाठी निवडली गेली. त्यामुळेच गुन्हेगार आश्रमाशी सुपरिचित असण्याच्या शक्यतेला विशेष बळ मिळते. तपास त्यादृष्टीनेही केला जावा.