दुर्घटने ‘त्या‘ व्यापाऱ्याचे कुटुंब झाले पोरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:49+5:302021-09-04T04:16:49+5:30
अमरावती : शहरातील राजापेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागून तेथे वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाचा धुरामुळे गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. ...
अमरावती : शहरातील राजापेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागून तेथे वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाचा धुरामुळे गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय व मुलं कोणतीही चूक नसताना पोरके झाले. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अन्य पाच लोकांचे प्राण वाचविण्यात यंत्रणेला यश आले. याप्रकरणी सदर हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्तपत्रांमध्ये वाचनात आले. सदर हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मत डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.
आस्थापनांना फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे, अशा आस्थापनांनी फायर ऑडिट केले की नाही, हे तपासण्याची जबाबदारीसुद्धा यंत्रणेतील अधिकाऱ्यांची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशातून होणाऱ्या पगारावर या सर्व यंत्रणेचे पोषण करायचे आणि जबाबदारीतून नामानिराळे व्हायचे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. जोपर्यंत हॉटेल मालकासोबतच यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून याची जबाबदारी निश्चित केली जाणार नाही तोपर्यंत असे निष्पाप बळी जातच राहणार. यंत्रणा कायम कोटगी होत जाणार. परत ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे यंत्रणा नवी दुर्घटना होण्याची वाट बघत राहणार. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे डॉ.सुनिल देशमुख यांनी या दुर्घटनेबाबत मत व्यक्त केले.