नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात; अवघे कुटुंब संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 05:34 PM2019-08-18T17:34:36+5:302019-08-18T18:04:07+5:30
नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी नागपूर- औरंगाबाद हायवे रस्त्यावरील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अनिल शारंगधर चंडिकापुरे (३२), कबीर अनिल चंडिकापुरे (४) हे दोघे बाप- लेक जागीच ठार झाले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अनिलची पत्नी प्रज्ञा अनिल चंडिकापुरे (२८), तर सावंगी मेघे येथील उपचारादरम्यान अनिलची आई लिलाबाई शारंगधर चंडिकापुरे (६०), असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
अनिल मागील अनेक वर्षांपासून नागपूर येथे पेंटिंगच्या व्यवसायाकरिता राहत आहे. रविवार दिवस असल्याने व रक्षबंधनासाठी चंडिकापुरे कुटुंबीय सकाळी नागपूरहून एम एच ४९ यू ३४०९ या कारने चांदूर रेल्वे तालुक्यातील मूळच्या जवळा धोत्रा जाण्यासाठी निघाले होते. तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरुद्ध दिशेने येणाºया ट्रक क्रमांक एम एच १७ बीडी ९७४३ या ट्रकने कारला धडक दिली. यात संपूर्ण कार ट्रकखाली घासली गेली. तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील ठार बाप लेकाचा मृतदेह बाहेर काढला. यात जखमी झालेल्या प्रज्ञा व लिलाबाई यांना उपचारासाठी पुलगाव येथे नेताना प्रज्ञाचा पुलगाव येथे मृत्यू झाला. लिलाबाई यांचा सावंगी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार शिरसाट व जमादार महादेव पोकळे करीत आहे.