दुचाकीला उडविल्यानंतर कार उलटली; तीन ठार, दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:51 AM2023-04-14T10:51:27+5:302023-04-14T10:56:36+5:30
दर्यापूर ते अकोला मार्गावर अपघात
दर्यापूर (अमरावती) : दुचाकीला उडविल्यानंतर अतिवेगात असलेली कार दोन-तीनदा उलटली. या अपघातात स्थानिक रहिवासी असलेला दुचाकीचालक व बुलडाण्याहून आलेल्या कारमधील दोघे ठार झाले. कारमधील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दर्यापूर ते अकोला मार्गावर गोळेगावनजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
पोलिस सूत्रांनुसार, दर्यापूर-अकोला मार्गावर घडलेल्या अपघातात प्रफुल्ल गावंडे (२७), प्रतीक राऊत (२५, दोघेही रा. बुलडाणा) व सचिन रामकृष्ण दुधंडे (३१, रा. लासूर, ता. दर्यापूर) हे तिघे मृत्युमुखी पडले. कारमधील पवन रामचंद्र तायडे (२७) व शुभम नागपुरे (२५, रा. बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले आहेत. एम.एच. १२ के.एन. ४०२८ क्रमांकाची कार अकोला येथून भरधाव वेगाने दर्यापूरकडे येत होती. याचदरम्यान मृत सचिन दुधंडे हा दर्यापूरहून लासूर या आपल्या गावाकडे दुचाकीने (एम.एच. २७ डी.बी. १११६) जात होता. गोळेगावनजीक कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार व कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकीला धडक दिल्यानंतर दोन-तीनदा उलटलेल्या कारचा चक्काचूर झाला आहे. गंभीर जखमी पवन तायडे व शुभम नागपुरे यांना दोघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.