ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला घात; टँकरच्या धडकेत २ ठार, चौदा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 12:46 PM2022-11-08T12:46:21+5:302022-11-08T12:47:36+5:30
रस्त्याच्या कडेला उलटून चेंदामेंदा झालेल्या ऑटोरिक्षातील प्रवासी गंभीर जखमी
तिवसा (अमरावती) : तिवसा तालुक्यातील कुऱ्हानजीक ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला टँकर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला, तर ऑटोरिक्षातील एकाचा मृत्यू झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी साडेसहानंतर ही घटना घडली.
तिवस्यावरून कुऱ्हााकडे येत असलेल्या टँकरने कुऱ्हा ते तिवसा मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी एका ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होती. या दुचाकीची धडक बाजूला असलेल्या ऑटोरिक्षाला बसली. या अपघातात दुचाकीस्वार सोमा चापाजी कोरडकर (५०, रा. घोटा) यांचा रस्त्यावर घासत गेल्याने जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उलटून चेंदामेंदा झालेल्या ऑटोरिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यापैकी कैलास वाघमारे (५०, शेंदूरजना बाजार) यांचा तिवसा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला.
वाठोडा येथील ग्रामीण विकास विद्यालयानजीक हा भीषण अपघात झाला. जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल. करण्यात आले. रौनग विशाल तेलंग (साडेतीन वर्षे, हिंगणघाट), शीतल माटे (२५, जवळा), रेखा वाघमारे (५०, रा. शेंदूरजना बाजार), श्रीकृष्ण वाघमारे (५२, रा. शेंदूरजना बाजार), आरोही तेलंग (साडेतीन, रा. शेंदूरजना बाजार), सविता शेंद्रे (२८, रा. तिवसा), विराट शेंद्रे (३, रा. तिवसा), दीप्ती शेंद्रे (२०, रा. तिवसा), प्रांजली मोरझडे (३१, रा. तिवसा), उमेश शिंदे (४०, रा. मोझरी), सीमा तेलंग (२५, हिंगणघाट ), तनुश्री मोरझडे (१३, रा. तिवसा), सानवी मोरखेडे (६, रा. तिवसा) यांचा जखमींमध्ये समावेश असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. यापैकी गंभीर जखमी असलेली काही 'जणांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
टँकर पकडला
अपघातास कारणीभूत ठरलेला एमएच यू ८४०५ क्रमांकाचा टैंकर कुन्हा पोलिसांनी मार्डीनजीक पकडला. संतोष शंकर मोरे (४६) या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
आटोरिक्षाचालक बेपत्ता?
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल .करण्यासाठी मदत केली. तथापि, अपघातग्रस्त ऑटोरिक्षा (एमएच २७ बीडब्ल्यू ३८३३) चा चालक मो. अहसान मो. अन्सार (रा. कुन्हा) हा अपघात घडल्यापासून बेपत्ता आहे. त्याच्याबाबत कुठलीही माहिती आतापर्यंत पुढे आलेली नाही.
तिसऱ्याचाही मृत्यू?
अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. तथापि, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.