भावी वकिलाचा अपघाती मृत्यू, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 09:55 PM2018-04-29T21:55:00+5:302018-04-29T21:55:00+5:30
ओव्हरटेकच्या प्रयत्नात मिनीट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणी टाकळीजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ओव्हरटेकच्या प्रयत्नात मिनीट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणी टाकळीजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडला. गणेश दिनकर देशमुख (२५,रा. शेगावनाका) असे मृताचे नाव असून, या अपघातात वैभव सदाशिव इंगळे (२१,रा.सिद्धार्थनगर, दर्यापूर) हा गंभीर जखमी झाला.
गणेश देशमुख हा मूळचा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून तो शेगाव नाका राहून विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो मूर्तिजापूर येथे एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कार्यरत होता. शनिवारी गणेश देशमुख व त्याचा मित्र वैभव इंगळे हे दोघेही दुचाकी क्रमांक एमच २७ सीएफ-३८९३ ने अकोला येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून दोघेही रात्रीच्या वेळेस दुचाकीने अमरावतीत परत येत होते. दरम्यान लोणीवरून बडनेराकडे येणाऱ्या मार्गावर अज्ञात मिनीट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्न करीत दुचाकीला उडविले. यामध्ये गणेश व वैभव हे दोघेही गंभीर जखमी झाले. काही नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मध्यरात्री १.४५ वाजतादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. वैभवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून झिरोची डायरी कायमी केली आणि पुढील तपासाकरिता हे प्रकरण लोणी पोलिसांच्या स्वाधीन केले.