नागपूरच्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘ॲक्सिडेंटल’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 01:22 PM2021-12-24T13:22:03+5:302021-12-24T16:27:56+5:30
शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची मुलगी मृतदेहाला बिलगली होती. तर लागलीच चार ४ वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला होता.
अमरावती : नागपूरहून ट्रॅव्हल्सने अमरावतीत आलेल्या त्या महिलेचा मृत्यू निव्वळ अपघात असल्याच्या निष्कर्षाप्रत गाडगेनगर पोलीस पोहोचले आहेत. शवविच्छेदन अहवालाअंती तो निष्कर्ष काढण्यात आला असून, त्याबाबत त्याचवेळी ‘एडी’ ॲक्सिडेंटल डेथ’ची नोंद करण्यात आली होती. ती कायम राखण्यात आली आहे. गुडूप अंधारात बाळाला स्तनपान करतेवेळी ती डोक्याच्या दिशेने खाली कोसळली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर, तिचे बाळ तिच्या अंगावर पडले, तरीही त्याच्या पायाचे हाड मोडल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.
नागपूर रोडवरील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची कन्या मृतदेहाला बिलगली होती. तर काही वेळात तिचा चार वर्षीय मुलगादेखील तेथे दिसून आला. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघड झाली होती. मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पो.स्टे.बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली होती. मात्र, हत्या की आत्महत्या हा प्रश्न कायम होता. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. तिने आत्महत्या केली असावी, अशी दाट शक्यता होती. मात्र, नेमकी कशी ते अनुत्तरित होते. कारण तिच्याजवळ, आसपास काहीही आढळून आले नव्हते किंवा घटनास्थळी तशा खाणाखुणादेखील नव्हत्या.
सीसीटीव्हीत ती लेकरांसोबतच
गाडगेनगर पोलिसांनी पहिल्या दिवशी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, तपासाला वेग देण्यात आला. घटनास्थळाच्या सूक्ष्म तपासणीनंतर परिसरातील सीसीटीव्ही पाहण्यात आले. त्यातील एका फुटेजमध्ये ती लेकरांसह शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या आवारात जाताना दिसते. तिच्या मागेपुढे कुणाचाही मागमूस दिसून आला नाही. त्यामुळे तिची बॅक हिस्ट्री तपासण्यात आली.
घरगती वादातून पडली घराबाहेर
घरगुती वादातून ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली. रात्रीच्या सुमारास अमरावतीला पोहोचली. जवळचे कृषी महाविद्यालय गाठले. मुलाला वरच्या माळ्यावर झोपवून दिले. ती लहानगीला स्तनपान करण्यासाठी त्या सिमेंटच्या रेलिंगवर बसली. त्यादरम्यान, ती आकस्मिकरित्या खाली कोसळली. अंगावर जखमा झाल्या नसल्या तरी ती अंतर्गत माराने मरण पावली, अशा अंतिम निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. तिच्यावर उपचारदेखील सुरू असल्याचे तपासात उघड झाले होते.
* संबंधित बातमी : कृषी महाविद्यालय परिसरात नागपूरच्या महिलेचा मृतदेह