गृहराज्यमंत्र्यांची बडनेरा ठाण्याला आकस्मिक भेट
By admin | Published: January 29, 2015 11:00 PM2015-01-29T23:00:01+5:302015-01-29T23:00:01+5:30
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला गुरूवारी अकस्मात भेट देऊन पाहणी केली. पोलीस एखाद्या पोलीस ठाण्याला गृहराज्यमंत्र्यांनी आकस्मिक भेट देण्याची ही पहिलीच
बडनेरा : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला गुरूवारी अकस्मात भेट देऊन पाहणी केली. पोलीस एखाद्या पोलीस ठाण्याला गृहराज्यमंत्र्यांनी आकस्मिक भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
गुरूवारी सकाळी १० वाजता गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचा ताफा बडनेरा पोलीस ठाण्यासमोर थांबला. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने काय झाले, हे तेथील कर्मचाऱ्यांना कळण्याच्या आत ना. रणजीत पाटलांनी ठाण्यात प्रवेश केला आणि पोलीस ठाण्याची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सर्वप्रथम स्टेश डायरी अंमलदार ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर ते थेट पुरूष आणि महिला बंदिगृहाकडे वळले. या दोन्ही बंदिगृहांचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. तेथील व्यवस्था तपासून आवश्यकतेनुसार सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात.
पश्चात गृहराज्यमंत्री बिनतारी संदेश खोली, क्राईम दप्तर खोली, स्वागत कक्ष, पोलीस निरीक्षकाचे कार्यालय, संगणक विभागाकडे वळले. याचवेळी त्यांनी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक आयुक्त साखरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांच्याकडून बडनेरा पोलीस ठाण्यात सन २०१३-१४ या दोन वर्षांत घडलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती घेतली.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास आलेल्या एका महिलेची गृहराज्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली.
रणजीत पाटील तब्बल अर्धा तास पोलीस ठाण्यात थांबले. बडनेरा पोलीस ठाण्याला पहिल्यांदाच एखाद्या गृहराज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने येथील कर्मचारी भांबावून गेले होते. पोलीस ठाण्याची पाहणी करून ते लगेच अमरावतीकडे रवाना झालेत. (शहर प्रतिनिधी)