कामाचा दर्जा, जबाबदारी सांभाळल्यास अपघात टळतील
By admin | Published: January 12, 2016 12:18 AM2016-01-12T00:18:17+5:302016-01-12T00:18:17+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच विद्युत विभागाच्या संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाचा दर्जा व जबाबदारी सांभाळल्यास विजेचे अपघात होणार नाहीत, ..
पालकमंत्री पोटे : विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
अमरावती : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच विद्युत विभागाच्या संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाचा दर्जा व जबाबदारी सांभाळल्यास विजेचे अपघात होणार नाहीत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. महावितरण, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, उद्योग ऊर्जा व कामगार, विद्युत निरीक्षकांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजिण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
आ. यशोमती ठाकूर, एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता सुरेश पाटील, सुहास रंगारी, विद्युत निरीक्षक प्रमोद दहाट, इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर, संघटनेचे सचिव मिलिंद बहाळे, विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत. यावेळी पोटे यांच्या हस्ते विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे तसेच चित्रफितीचे उदघाटनही करण्यात आले. किरण पातुरकर म्हणाले, उद्योजक व कामगारात सद्यस्थितीत जागरूकताआली आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी विद्युत विभागाने दर्जेदार कामे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य अभियंता सुरेश पाटील म्हणाले विद्युत विभागाची सेवा ही ग्राहकाभिमुख आहे. सेफ्टी फस्ट, वर्कस नेक्स्ट अशी संकल्पना राबवावी, अपघात कमी होतील. यावेळी विद्युत निरीक्षक प्रमोद दहाट, मुख्य अभियंता सुहास रंगारी, कार्यकारी अभियंता गुटलिया यांची समयोचित भाषणे झाली. सप्ताहात विद्युत सुरक्षेसाठी चित्रकला स्पर्धा, चित्ररथ, पोस्टर्स, बॅनर्स, लिफलेट, पथनाट्य आदी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)