ताज्या वृत्तानुसार आज अमरावतीत तब्बल १८ पॉझिटिव्ह; जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:12 PM2020-05-20T13:12:40+5:302020-05-20T13:57:59+5:30
अमरावती शहरातील विविध भागांतून तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या थ्रोट स्वॅब अहवालाचा रिपोर्ट बुधवारी १२ वाजता प्राप्त झाला. यामध्ये १० महिला व आठ पुरुष अशा १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन हादरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठाच्या लॅबद्वारा बुधवारी दुपारी १२ वाजता आलेल्या १८ पॉझिटिव्ह अहवालाने शहराला हादरा बसला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३३ झालेली आहे. याव्यतिरिक्त धामणगाव तालुक्यातील तीन रुग्णांचे अहवाल वर्धा जिल्ह्यात व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील सात वर्षीय बालकाचा अहवाल भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेला आहे.
बुधवारी प्राप्त अहवालानुसार, येथील नवे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे आणखी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या कंटेनमेंटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १९ झालेली आहे. या व्यतिरिक्त शिवनगर येथे दोन, पाटीपुरा येथे दोन, सिंधूनगर, रहमतनगर, बेलपुरा, पॅराडाईज कॉलनी, चेतनदास बगिचा, प्रबृद्ध विहार, पार्वतीनगर व नांदगाव पेठ येथे प्रत्येकी एक कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे.
बुधवारी चार नव्या भागांत कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. महापालिकेद्वारा बाधितांच्या घराकडील मार्ग बंद करण्यात येत आहे. आयुक्तांद्वारा नवे कंटेनमेंट जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरोग्य विभागाद्वारा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.