विवाह समारंभात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:46 AM2019-07-13T01:46:00+5:302019-07-13T01:46:45+5:30
मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे.
कुणाल राजेंद्र मिश्रा (२३, रा. नारायणनगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असलेले अमित श्यामकांत कलोती यांचा विवाह ११ जुलै गुरुवारी बडनेरा मार्गावरील परिणय बंध लॉन येथे झाला होता. विवाह समारंभात पाहूणे म्हणून आलेल्या युवकाने नवरीला लग्नात आप्तमंडळीकडून भेटस्वरूपात मिळालेल्या पैशाच्या पाकिटावर चोरट्याने डल्ला मारला. ही बाब नवरीच्या लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी सूत्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. विशेष म्हणजे, कलोती परिवारातील विवाह समारंभाला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस उपस्थित होत्या. त्यामुळे या समारंभावर पोलिसांची करडी नजर होती. तरीही आरोपीने या नवरदेव-नवरीच्या व्यासपीठाजवळ जाऊन नवरीला खाऊ एकत्रित करून ज्या पाकिटात ठेवला होता, ते लंपास करण्याचे धाडस केले. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, हेडकॉन्स्टेबल रंगराव जाधव, फिरोज खान, छोटेलाल यादव, किशोर अंबुलकर, राजेश गुरुले, दिनेश भिसे, सुनील ढवळे यांनी केली.