जुळ्या चेहऱ्यामुळे निरपराध गावकरी ठरला फरार आरोपी!
By admin | Published: February 13, 2017 12:01 AM2017-02-13T00:01:53+5:302017-02-13T00:01:53+5:30
चार वर्षांपूर्वी वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार असलेला आरोपी ताब्यात घेतला असता तो आरोपी नसून ग्रामस्थ असल्याची बाब शुक्रवारी वरूड येथे उजेडात आली.
वनकर्मचाऱ्यांचा प्रताप : अखेर माफी मागून निस्तरले प्रकरण
अमरावती : चार वर्षांपूर्वी वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार असलेला आरोपी ताब्यात घेतला असता तो आरोपी नसून ग्रामस्थ असल्याची बाब शुक्रवारी वरूड येथे उजेडात आली. मात्र, संतप्त गावकऱ्यांसमोर माफी मागून वनकर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रसंग ओढवला, हे विशेष.
प्राप्त माहितीनुसार, वरूड रेंजमध्ये व्याघ्र कातडी तस्करीची घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध वनविभागाने गुन्हे दाखल केले होते. यात तीन आरोपींना शिक्षादेखील झाली आहे. यात तीन आरोपी हे काटोल येथील आहेत. मात्र, वरूडनजीकच्या पवनी येथील रहिवासी विनोद राऊत हा मागील चार वर्षांपासून वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार आहे. विनोद राऊत हा घरी येत असून त्याचे गावात वास्तव्य असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती.
शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी मुसळखेडा येथील यात्रेत फरार आरोपी विनोद राऊत आल्याची गोपनीय माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. यामाहितीच्या आधारे वरुड रेंज वन कर्मचाऱ्यांनी फरार आरोपी राऊत याच्या मोबाईलमधील छायाचित्राच्या आधारे यात्रेतून राऊतऐवजी प्रदीप रावणकर नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीचा चेहरा हुबेहूब फरार आरोपी राऊत याचेशी मिळता-जुळता असल्याने वनकर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद काही क्षण मनोमन साजरा केला. त्यानंतर वरूड वनवर्तुळ कार्यालयात ताब्यात घेतलेल्या रावणकर याचेवर वाघ कातडी तस्करीप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, रावणकर यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. कोणताही आरोपी ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेत असल्याने काही वनकर्मचाऱ्यांनी रावणकर याला ‘प्रसाद’ दिला. नेमके काय झाले, हेच रावणकर यांना सुरूवातीला कळले नाही. मात्र, आपण चार वर्षांपासूनचा फरार आरोपी ताब्यात घेतल्याने आता वरिष्ठांकडून कौतुक होईल, अशी मनीषा बाळगून असलेल्या वनकर्मचाऱ्यांचा अवघ्या अर्ध्या तासांतच भ्रमनिरास झाला. पकडलेली व्यक्ती ही आरोपी नसून ते मुसळखेड्यातील सर्वसामान्य रहिवासी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भाचे पुरावे गावकऱ्यांनी वनविभागाकडे सादर केलेत. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची संपूर्ण ओळख पटल्यानंतर वनविभागाने प्रदीप रावणकर यांना बिनशर्त सोडून दिले. परंतु मिळते-जुळते चेहऱ्यामुळे निरपराध व्यक्तीवर आरोपी बनण्याची वेळ आली.
वनकर्मचाऱ्यांनाही खरा प्रकार उशिरा कळल्याने त्यांच्या हातून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार घडता-घडता राहिला.
फरार आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तिची ओळख पटल्यानंतर त्याला सोडून दिले आहे. वनकर्मचाऱ्यांनी जुळ्या चेहऱ्यामुळे त्याला ताब्यात घेतले होते. मात्र नागरिकांनी सत्यता पटवून दिली. अनवधानाने हा प्रकार घडला आहे.
- अशोक कविटकर,
सहायक वनसंरक्षक, मोर्शी- वरुड