कविठा प्रकरणात आरोपींची हत्येची कबुली, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 10:40 PM2021-02-17T22:40:48+5:302021-02-17T22:41:45+5:30
खुनाचा गुन्हा दाखल, दोघांना अटक
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील कविठा बु। गावात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाची कबुली अखेर आरोपींनी परतवाडा पोलिसांकडे दिली. आरोपींची कबुलीनंतर पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. कविता बुद्रुक येथील विजय जाधव (४५) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे कविठा ते परतवाडा मार्गावर गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. तेव्हापासूनची राजकीय वैमनस्यातून घडलेली हत्या असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
परतवाडा पोलिसांनी निखिल सोनार (३०) आणि धीरज जावरकर (२५, रा. कविठा बुद्रुक) यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनीही रात्री उशिरा वैयक्तिक कारणावरून विजयच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली. यावरून या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. विजयचा चुलत भाऊ नीलेश जाधव (३७, रा. कवठा बु।) यांनी घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे फिर्याद दिली. आरोपी धीरज जावरकर व निखिल सोनार यांनी संगनमताने विजयला दुचाकीवर बसून नेले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा उपसरपंच न झाल्याने मनात द्वेष ठेवून मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान त्यांनी विजयच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार करून त्याला ठार केल्याचे फिर्यादीने जबाणी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासले. त्यात आरोपी गिरजा निखिल हे विजयला मोटरसायकलवर घेऊन जात असल्याचे दिसून आले. याच दरम्यान काही लोक त्याठिकाणी बसून असल्याचेही फुटेजमध्ये आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडेही चौकशी केली.
बंदोबस्त कायम
घटनेनंतर गावात दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हाच बंदोबस्त दुसर्या दिवशीही कायम होता. गावात सर्वत्र शांतता आहे.
निर्घृण हत्या
मृतक विजयची हत्या निर्दयीपणे केल्या केली. यात त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाचा आघात केल्या गेला. त्याचे डोके, कवटी फुटली. त्यातून मेंदू बाहेर पडून लहान लहान तुकडे घटनास्थळावर विखुरले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. तसेच या घटनेतील एक आरोपी दारू व्यवसायाशी निगडित असल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुल्हाने करीत आहेत.