आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
By Admin | Published: May 12, 2016 12:42 AM2016-05-12T00:42:02+5:302016-05-12T00:42:02+5:30
राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी असतानाही मद्यधुंद अवस्थेतील सहा व्यक्तींनी वनरक्षकास कोका राखीव अभयारण्यात मारहाण केली.
प्रकरण वनरक्षकाला मारहाणीचे : सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त
भंडारा : राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी असतानाही मद्यधुंद अवस्थेतील सहा व्यक्तींनी वनरक्षकास कोका राखीव अभयारण्यात मारहाण केली. यासोबतच वनरक्षकाजवळील रोख रक्कम व साहित्य पळविले होते. या प्रकरणात लाखनी पोलिसांनी आरोपींना एका दिवसात अटक करून त् यांच्याकडून ३ लाख २० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्शीपार (कोका) राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन बंदी आहे. वनविभागाचे हे नियम धाब्यावर बसवून विरेंद्र दमाहे, संतोष लिल्हारे, सुखराम मोहारे, सचिन ठवकर, राजकुमार बिरनवारे, वसंत भवसागर यांनी वनपरिक्षेत्रात एम.एच. २८ व्ही ३८९२ या चारचाकी वाहनासह प्रवेश केला होता.
राखीव वनपरिक्षेत्रात ते मद्य प्राशनावर बंदी असतानाही गाडीच्या खाली उतरून मद्यप्राशन करीत होते. यावर कर्तव्यावर असलेल्या संजय अंबुले या वनरक्षकाशी झालेल्या वादानंतर त्याला मारहाण करून त्याच्याजवळील साहित्य लांबविले.
याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलीस अधीक्षक विनिता साहू व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चाकाटे यांनी सर्व आरोपींना ३६ तासांच्या आत अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता सहाही जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
बुधवारला त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने साकोली तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. यावेळी सचिन ठवकर व राजकुमार बिरणवारे या दोघांची आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढविली असून अन्य चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सर्व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन ज्याची किंमत तीन लाख रुपये, मारहाणीसाठी वापरण्यात आलेले गाडीतील पाने, लांबविलेल्या रकमेपैकी चार हजार रुपये व झटापटीनंतर सापडलेली १६ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची चैन असा एकूण ३ लाख २० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, पोलीस कोठडीतील आरोपींनी राखीव वनक्षेत्रात प्रवेश करून दारु पिऊन धिंगाणा घातल्याची कबुली दिली. यावेळी आलेल्या वनरक्षक अंबुले यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती ठाणेदार चाकाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी व अन्य प्रकारचे निर्बंध असतानाही प्रवेश करून मद्यपान करून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या ठाणेदार चाकाटे यांनी ३६ तासाच्या आत मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस हवालदार भगवान खेर, पोलीस हवालदार हेमके यांनी केली.
(शहर प्रतिनिधी)