कडेकोट बंदोबस्तात आरोपींची न्यायालयात पेशी
By admin | Published: November 4, 2015 12:09 AM2015-11-04T00:09:49+5:302015-11-04T00:09:49+5:30
गांधी चौकात रविवारी रात्री घडलेल्या मुशिर आलम हत्याप्रकरणातील पाचही आरोपींना मंगळवारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
मुशिर आलम हत्याकांड : पाचही आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती : गांधी चौकात रविवारी रात्री घडलेल्या मुशिर आलम हत्याप्रकरणातील पाचही आरोपींना मंगळवारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या पाचही आरोपींना न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गांधी चौक ते जवाहर मार्गावरील जुना मोटर स्टॅन्ड परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुशिर आलमसह तनवीर आलम, जीया अहमद, चिंटू ऊर्फ मुशिर आलम व बाबा ऊर्फ मकसूद आलम या चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणातील आरोपी उमेश आठवलेंसह अंकुश सुभाष जिरापुरे (२६), नीलेश अशोक आठवले (२७) व शुभम् तात्यासाहेब जवंजाळ (३१) आणि राजू मांडवे (२५,सर्व रा.माताखिडकी, महाजनपुरा) यांनी तलवारीने हा प्राणघातक हल्ला केला होता.
कायदा-सुव्यवस्था कायम राखा- सुनील देशमुख
घटनेच्या पार्श्वभूमिवर सोमवारी आमदार सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या कक्षात मंगळवारी बैठक बोलविली. शहरातील अवैध व्यवसाय व गुंडगिरीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांना त्यांनी निर्देश दिलेत. शहरातील असामाजिक तत्त्वांनी मुशिरचा बळी घेतला. या गुन्हेगारावर पोलिसांचा वचक कायम राखणे गरजेचे आहे. पोलिसांनी अवैध वाहतुकीकडे लक्ष केंद्रित करावे. हातगाड्यांवर दारू पिऊन सर्रास वादविवादाच्या घटना घडतात. यातून मोठा प्रकार घडू शकतो. त्यामुळे वेळीच या गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे यावेळी आ. सुनील देशमुख म्हणाले. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कसोशीने शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आ.सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना दिल्यात. बैठकीला शोएब खान, मुजफ्फर मामू, मतीन, शेख सुलतान, नावेद पटेल उपस्थित होते.