जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:34+5:302021-05-23T04:12:34+5:30
अमरावती : एमआयडीसीतील एका कामगाराला चाकूने भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही आरोपींनी जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली ...
अमरावती : एमआयडीसीतील एका कामगाराला चाकूने भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही आरोपींनी जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. यश धनराज बहुराशी (१९) व मोहित मोहन कैथवास (१८ दोन्ही रा. मायानगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बडनेरा हद्दीतील आणखी काही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अब्दुल अली मौला (२० रा. सिंघानिया एमआयडीसी) हा कुणाल सिंघानिया यांच्या गारमेंट कंपनीत शिलाईकाम करतो. तो पश्चिम बंगालच्या चौबीस परगणा जिल्ह्यातील शिवन तोलारचा रहिवासी आहे. २१ मे रोजी रात्री तो अग्रवाल धरम काट्याजवळील परिसरात खाण्यापिण्याचे साहित्य शोधत होता. त्यावेळी एका वाहनावर आलेल्या दोन तरुणांनी अब्दुल अलीला तू कुठे राहतो, असे विचारले, त्याने समोरच राहत असल्याचे इशाऱ्याने सांगितले. याच कारणावरून एका तरुणाने अब्दुल अलीवर चाकूने हल्ला केला. त्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता.
बॉक्स:
या पथकाची कामगिरी
कामगाराला चाकू मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलविली. पोलीस आयुक्त आरती सिंह, उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त शिवाजी धुमाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, उपनिरीक्षक काठेवाडे, पोलीस नाईक छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने, सागर सरदार, पोलीस शिपाई दिनेश भिसे व नरेश मोहरील यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.