आरोपी गुणवंत उमकला चार दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:48+5:302021-06-30T04:09:48+5:30
तिवसा : शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांच्या हत्याप्रकरणी पाचव्या आरोपीला सोमवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर तिवसा पोलिसांनी त्याला तिवसा ...
तिवसा : शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांच्या हत्याप्रकरणी पाचव्या आरोपीला सोमवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर तिवसा पोलिसांनी त्याला तिवसा न्यायालयात दुपारी हजर केले होते. त्याला न्यायालयाने २ जुलैपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. या हत्याकांडातील पाचही आरोपींकडून तिवसा पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
अमोल पाटील यांच्या हत्येनंतर तिवसा शहर हादरून गेले. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत आहेत. मात्र, तपासाअंती आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दिली. या प्रकरणात संदीप ढोबाळे, प्रवीण ढोबाळे या सख्ख्या भावांसह अविनाश पांडे, रूपेश घागरे, गुणवंत उमक हे पाच जण अटकेत आहेत. प्रकरणात आतापर्यंत केवळ गोविंदा जसवाणी यांचे बयाण नोंदवण्यात आले. मात्र, त्यांनी नेमके अमोलला कोणी मारले व कोणी वार केले, हे बयाणात सांगितले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रत्यक्ष घटना पाहणारा साक्षीदार अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही. मात्र, सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. हे विशेष लक्ष घालत असल्याने या प्रकरणात पोलीस विशेष बारकाईने अभ्यास करून तिवसा पोलीस तपास करीत आहे. अटकेतील आरोपी यांच्याकडून पोलीस माहिती घेत असून, पाचही आरोपींना २ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.