मनोजच्या हत्याप्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
By प्रदीप भाकरे | Published: July 3, 2023 07:23 PM2023-07-03T19:23:33+5:302023-07-03T19:23:40+5:30
तारखेडा परिसर चिंतीत : तरुणांनी साधला पोलिसांशी संवाद
अमरावती: तारखेडा येथील मनोज सोनी याच्या हत्येप्रकरणी २ जुलै रोजी अटक केलेल्या आरोपी फैजान खान याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी दुपारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान दुसरा निष्पन्न आरोपी शाहबाजच्या शोधार्थ पोलीस पथके गठित करण्यात आली आहेत.
तारखेडा येथील गणपती मंदिरासमोरील जागेवर मनोज हिरालाल सोनी याची १ जुलै रोजी उशिरा रात्री १२.१५ च्या सुमारास चाकुने भोसकून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी मृताचा भाऊ कैलास सोनी (३५) याच्या तक्रारीवरून २ जुलै रोजी पहाटे ३.२३ च्या सुमारास अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी भाजीबाजार येथील सभागृहात तारखेडा परिसरातील युवक, नागरिक आणि मृत मनोजचे आप्त एकत्र आले. त्यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना निमंत्रित करून भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार, पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सभागृहात येऊन परिसरातील जनतेचे म्हणणे ऐकून घेतले. तथा योग्य रीतीने तपास होत असल्याचा विश्वास दिला. या प्रकरणातील दुसरा आरोपी लवकर शोधून गुंतागुंत सोडवावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी ठाणेदार रमेश ताले व गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे देखील उपस्थित होते.
तपास सुरू आहे !
२ जुलै रोजी अटक केलेल्या आरोपीला केव्हापर्यंत पोलीस कोठडी मिळाली, अशी विचारणा केली असता, तपास सुरू असल्याची माहिती खोलापुरी गेटचे नवनियुक्त ठाणेदार रमेश ताले यांनी ‘लोकमत’ ला दिली. त्याचवेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी अटक आरोपीला ५ जुलैपर्यंत अर्थात तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सांगितले.
मृत मनोजची पत्नी गर्भवती
मनोजच्या पत्नीची अवस्था अत्यंत करूण आहे. ती विवाहाच्या आठ वर्षांनी गर्भवती झाली. त्या दाम्पत्याच्या जीवनात आनंदाचा क्षण आला असताना अज्ञात कारणाने मनोजचा खून करण्यात आला. मनोज परिसरात लोकप्रिय होता. रस्त्याने चालणाऱ्या वृद्धाला धक्का लागला म्हणून सपासप वार करून त्याचा निर्घृण खून झाला. त्यावर परिसरातील जनतेचा आक्षेप असल्याचा सूर तेथे उमटला.