बिबट्या शिकार प्रकरणातील आरोपींना जामीन नामंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:21 PM2021-02-19T21:21:33+5:302021-02-19T21:26:29+5:30
आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
धामणगाव रेल्वे (अमरावती) : चांदूर रेल्वे प्रादेशिक परिक्षेत्रातील दत्तापूर नियतक्षेत्रात मौजा तळेगाव दशासर येथील शेताच्या धुऱ्याला विद्युत प्रवाह लावून बिबट्याची शिकार केल्याच्या प्रकरणातील आरोपींना जामीन नामंजूर करण्यात आला. प्रभाकर शिंदे (रा. तळेगाव दशासर), विजय नागोसे व रवींद्र थूल (दोन्ही रा. कोठा अलिपूर, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी आ.अ. कोकाटे यांनी धामणगाव रेल्वे येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमक्ष उपस्थित केले.
न्यायालयाने आरोपींना १८ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडीत पाठविले होते. त्यांना १८ रोजी पुन्हा उपस्थित केले असता, न्यायालयाने आरोपींचा जामीन नामंजूर केला तसेच न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सदर प्रकरणात वनविभागातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सतीश घोडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
बिबट्याचे अवयव जप्त
प्रभाकर शिंदे याने घटनास्थळ दाखविण्याची कबुली १७ फेब्रुवारी रोजी दिली. त्यावरून सहायक वनसंरक्षक लीना आदे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर हे लोखंडे महाराज देवस्थानाच्या मौजा कोठा अलिपूर येथील शेतात पोहोचले. ज्या ठिकाणी बिबट जमिनीत गाडण्यात व जाळण्यात आला, त्या ठिकाणावरून शिकार केलेल्या बिबटचे केस, न जाळलेली हाडे १० नग, जाळलेली हाडे अंदाजे ५०० ग्रॅम, चामड्यासह केसाचे पुंजके, जळालेली दाताचे तुकडे १३ नग, न जळालेले नख, बांबूची काठी, लोखंडी तार, इलेक्ट्रिक वायर जप्त आदी साहित्य जप्त केले आहे.