साक्षीदार म्हणून सही करण्यास नेले अन् वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:08 IST2021-11-29T18:01:45+5:302021-11-29T18:08:28+5:30
साक्षीदार म्हणून अंगठा देणाच्या बहाण्याने आरोपींनी एका वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले. १९ जानेवारी रोजी येथील सहायक निबंधक वर्ग-२ चे शाखा क्रमांक ३ या कार्यालयात ही घटना घडली.

साक्षीदार म्हणून सही करण्यास नेले अन् वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले
अमरावती : साक्षीदार म्हणून अंगठा देणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाचे २८ लाख रुपयांचे घर पैसे न देता हडपण्यात आले. १९ जानेवारी रोजी येथील सहायक निबंधक वर्ग-२ चे शाखा क्रमांक ३ या कार्यालयात ही घटना घडली.
याप्रकरणी नारायणराव अभिमानजी खडगे (८५, विजयनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी उमेश रघुनाथ महाजन व दोन महिला (सर्व रा. डाबकी रोड, इंदिरानगर) यांच्याविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यातील आरोपींनी खडगे यांंना साक्षीदार म्हणून सही करण्यास नेले. ते सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात आरोपींसोबत गेले. तेथे एका ठिकाणी अंगठा मारून परतले. यादरम्यान ऑगस्टमध्ये खडगे यांचा मुलगा घरी आला. तेव्हा आरोपींचे काही कागदपत्रे घरी राहिल्याचे खडगे यांनी मुलाला सांगितले. ती कागदपत्रे पाहिल्यानंतर ते खरेदीखत असल्याचे लक्षात आले.
आरोपींनी नारायणराव खडगे यांचे घर ३ लाख ५८ हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे ते खरेदीखत होते. खरेदीमध्ये खडगे यांना तेवढ्या रकमेचा धनादेश दिल्याचेही नमूद होते, मात्र, प्रत्यक्षात तसा कुठलाही धनादेश किंवा रक्कम न मिळाल्याने खडगे यांनी त्यानंतर उमेश महाजन व अन्य दोन महिलांशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावर आता तुम्हाला पैसे व घर काहीही मिळणार नाही. त्या घरावर आता आमचा अधिकार आहे, असे खडगे यांना सुनावण्यात आले. सबब, तीनही आरोपींनी आपले २८ लाख रुपये किमतीचे घर स्वत:च्या नावावर करून फसवणूक केल्याचे खडगे यांनी २८ नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.