चौकशीसाठी बोलावल्याने बदनामी; आता आत्महत्या करतो! आरोपीची पोलिसाला धमकी
By प्रदीप भाकरे | Published: September 29, 2022 05:38 PM2022-09-29T17:38:22+5:302022-09-29T17:48:06+5:30
गाडगेनगर पोलीस ठाण्यातील घटना
अमरावती : चौकशीसाठी बोलावल्याने आपली समाजात बदनामी झाली. त्यामुळे आपण आत्महत्या करणार अशी धमकी आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला दिली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी योगेश रमेशराव कोंडे (३६,रा. प्रशांतनगर, वलगाव) याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास पोलीस कर्मचारी उमेश भोपते हे गाडगेनगरच्या डीबी रूममध्ये असताना योगेशने मोबाईल कॉल करून ती धमकी दिली.
गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हयात योगेश कोंडे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गाडगेनगर पोलीस ठाण्यात पाचारण करून त्याची गाडगेनगर पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्या गुन्हयात त्याचा सहभाग निष्पन्न न झाल्याने त्याला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अशी झाली घटना
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी पोकॉ उमेश भोपते हे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या आवारातील डीबी रूममध्ये असताना त्यांना योगेश कोंडे याने फोन कॉल केला. आपण मला पोलीस ठाण्यात चौकशीकरीता आणले. चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात बोलावल्यामुळे आपली बदनामी झाली. त्यामुळे आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी त्याने दिल्याचे भोपते यांनी तक्रारीत म्हटले आहे. मोबाईल क्रमांक ट्रेस करण्यात आला. तो योगेश कोंडे याचा निघाल्याने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास गाडगेनगरचे पोलीस उपनिरिक्षक संजयसिंग चव्हान हे करीत आहेत. आत्महत्या करण्याची धमकी देत त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे.