अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्ह्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:33+5:30
अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता.
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर जिल्ह्याची मागणी सन १९८० पासून असली तरी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव प्रशासकीय स्तरावरून शासनदरबारी दाखल झाला. अचलपूर जिल्हा निर्मितीच्या या प्रस्तावाने प्रशासकीय स्तरावरील सर्व टप्पे पूर्ण केले असून, अचलपूर जिल्हा निर्मितीच्या पंगतीत शासनदरबारी पहिल्या पाचमध्ये पोहोचलेला आहे.
अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता. अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठविल्याबाबत प्रशासनाने आमदारांना आश्वस्त केले. या अनुषंगाने १८८.४१ कोटींच्या अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी तालुक्यांसह आसेगाव आणि चुरणी या दोन नवे तालुके प्रस्तावित आहेत. सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली गेली. १८६७ ते १९०५ पर्यंत इंग्रज राजवटीत अचलपूर जिल्हा अस्तित्वात असल्याचे यात स्पष्ट केले गेले.
प्रशासकीय दृष्टिकोन व जनहिताच्या सोयी-सवलती लक्षात घेता, अमरावती जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचा अभिप्रायही प्रशासनाने दिला. भौगोलिक दृष्टिकोनातून अचलपूर हे नवीन जिल्हा मुख्यालयाकरिता योग्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. आ. कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे फलित ठरले.
दिवाळीला आंदोलन, ४१२ दिवस साखळी उपोषण
अचलपूर जिल्हा व्हावा, याकरिता आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ रोजी ५०० कार्यकर्त्यांसमवेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. नंतर दुसऱ्या दिवसापासून प्रहारने याच मागणीकरिता ४१२ दिवस साखळी उपोषण केले. यात १५५ गावांतील युवकांनी सहभाग नोंदविला, तर तब्बल १० हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. अचलपूर जिल्ह्याच्या मागणीकरिता ते एकमेव असे पहिले रचनात्मक आंदोलन ठरले. या आंदोलनाची दखल तत्कालीन सरकारनेही घेतली होती. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बच्चू कडूंसह प्रहारच्या शिष्टमंडळासोबत अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने चर्चा केली होती.
सात वेळा सकारात्मक चर्चा
प्रशासनाकडून शासनदरबारी सादर अचलपूर जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावाचा आमदार बच्चू कडू यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. मुख्यमंत्र्यांशी या अनुषंगाने बच्चू कडू यांची सात वेळा सकारात्मक चर्चा झाली. राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण राबविताना अचलपूरचा निर्णय घेतला जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना आश्वस्त केले आहे.