अचलपुरात घरगुती गॅस सिलिंडर ८८० रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:28+5:302021-03-08T04:13:28+5:30
अचलपूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाल्याने अचलपुरात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली आहे. परिणामी, स्वयंपाकघरात ...
अचलपूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाल्याने अचलपुरात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली आहे. परिणामी, स्वयंपाकघरात महागाईचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊन होते. मजूर, गरीब, मध्यमवर्गीयांच्या हाताला, व्यवसायात काम नसताना दिवसेंदिवस गॅस सिलिंडरचे भाव वाढत असताना महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल, डिझेल शंभरीजवळ पोहोचले असताना, घरगुती गॅस सिलिंडर अचलपुरात ८८० रुपयांना मिळत आहे. एलपीजीच्या गॅसच्या दरात १ मार्चपासून २५ रुपयांनी वाढ झाली असून, अवघ्या २० दिवसांत गॅस सिलिंडर तब्बल २५० रुपयांनी महागले आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात सर्वाधिक दरवाढ गॅस सिलिंडरवर झाले आहे. अचलपुरात ८८० रुपयांना सिलिंडर घरपोच मिळत आहे. गॅस सिलिंडरची सबसिडी शासनाने बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना अनुदानित असो वा विना अनुदानित, सिलिंडरसाठी एकच दर द्यावा लागत आहे. कोविडचे संकट त्यात महागाईचा वाढता आलेख सामान्य कुटुंबासाठी न पेलणारा ठरत आहे. त्यामुळे गृहिणीच्या घरातील बजेट कोलमडले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच जण घरीच असल्याने सिलिंडरचा वापर सर्वाधिक होत आहे. सिलिंडर महाग झाल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चुली पेटवून लाकडी इंधनाचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीकडे वळावे लागले आहे.
बॉक्स
सर्व स्तरांतून रोष
पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्यामुळे सर्व स्तरांतून रोष व्यक्त होतो. घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. याच कारणामुळे नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. हातावर पोट असणाऱ्यांसह मध्यमवर्गीयदेखील केंद्र सरकारवर टीका करीत आहेत.
बॉक्स २
गॅस ३५ दिवसांत १२५ रुपयांनी महाग
पेट्रोल आणि डिझेलचे दर काही दिवसांपासून वाढत आहेत. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा भावही वाढतो आहे. मागील काही दिवसांचा विचार केला, तर एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल तीन वेळा गॅसच्या किमती वाढल्या आहेत. या महिन्यात १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी वाढली. या महिन्याच्या सुरुवातीला गॅसची किंमत पुन्हा २५ रुपयांनी वाढवली गेली. त्यामुळे एकंदर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १२५ रुपयांनी वाढ झाली.
---------
पान ३ चे लिड