अचलपूर तहसील आपत्ती कक्षाला आपत्तीने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:50+5:302021-07-20T04:10:50+5:30
मुंगूस, कातीनसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार अनिल कडू परतवाडा : नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे इत्यादी आपत्कालीन ...
मुंगूस, कातीनसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार
अनिल कडू
परतवाडा : नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे इत्यादी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अचलपूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पण या आपत्ती कक्षालाच आपत्तीने ग्रासले आहे.
या आपत्ती कक्षात मुंगूस, कातीनसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. यात जे कर्मचारी रात्रीच्या कर्तव्यावर हजर होतात त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. या ठिकाणी त्या कक्षाच्या दाराला साखळी नाही. कडी कोयंडा नाही. रात्रीला दार आतून बंद करता येत नाही.
तहसीलचे इतिहासकालीन प्रवेशद्वारही सताड उघडे राहते. यात त्या कक्षात अंग टाकायला साधे बेंचही नाहीत. खोलीतील कचरा आणि अर्ध्या खोलीत असलेल्या उंच मोठमोठ्या अद्ययावत कपाटांच्या साक्षीने सायंकाळी आपल्या कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव रात्रभर टांगणीला राहतो.
--- पोलीस, चौकीदार दिसेनासे---
या तहसील कार्यालयात कोषागार आहे. या कोषागाराकरिता पोलीस रात्रीला तैनात असतात. पण अलीकडच्या काळात हे पोलीसही रात्रीला दिसेनासे झाले आहेत. तर तहसीलचे रात्रपाळीतील चौकीदारही कर्तव्यावर हजर राहत नाहीत. त्यामुळे तहसीलमध्येच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
---नो रिप्लाय---
या नियंत्रण कक्षात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त संदेश घेऊन, संदेशाची नोंद नोंदवहीत करणे आवश्यक आहे. नोंदवहीत संदेश नोंदविल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षालाही त्याची माहिती देण्याकरिता फोन नंबर दिलेला आहे. हा नंबर डायल केल्यानंतर बऱ्याचदा रात्रीचा उचलल्या जात नाही. तो नो रिप्लाय होतो.
--- रुबाब लई भारी--
सोबतच हा संदेश तहसील कार्यालयातील सचिन कन्नमवार यांच्या मोबाईलवर त्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो. त्यांचेही या कक्षाकडे दुर्लक्ष आहे. तहसीलदारांपेक्षा त्यांचा रुबाब अधिक असतो. सर्व तयार माहिती कन्नमवार यांच्याकडे दिली गेल्यानंतरही त्यांना माहिती विचारल्यास थांबा, देतो, बसा, असे बोलून ते वेळ मारून नेतात. प्रसिद्धी माध्यमांनाही वेळेवर माहिती भ्रमणध्वनीवरून दिली जात नाही.
दि.19/7/21 फोटो दोन