अचलपुरात ठाणेदारावर विळ्याने हल्ला, पत्नीच्या तक्रारीवरून अटक करायला गेले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:55 PM2017-11-13T20:55:07+5:302017-11-13T20:55:18+5:30
परतवाडा (अमरावती) : पत्नीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यास गेलेल्या एका इसमाने ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचा-यावर विळ्याने हल्ला केला.
परतवाडा (अमरावती) : पत्नीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यास गेलेल्या एका इसमाने ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचा-यावर विळ्याने हल्ला केला. यात तिघेही जखमी झाले. ही घटना अचलपूर शहरातील सरमसपुरा ठाणे हद्दीत सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
ठाणेदार अभिजित अहिरराव, पोलीस शिपाई गणेश बेलोकार व माधव ठाकरे असे जखमी पोलिसांची नावे आहेत, तर हल्ला करणा-या आरोपी लल्लू सय्यद कलीम सय्यद हनीफ (४०, रा. मंजुरपुरा, अचलपूर) यास पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, लल्लू सय्यद कलीम हा पत्नी हमीदा बी हिला त्रास देत होता. सोमवारी लल्लूने पत्नीला मारहाण केली. याची माहिती पत्नी हमीदाने भाऊ शेख जलीम अब्दुल राऊफ (रा. आर्वी) व आईला दिली. बहिणीला जिवे मारण्याची भीती वर्तवित सरमसपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून ठाणेदार अभिजित अहिरराव व दोन पोलीस कर्मचारी हे लल्लूला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. दारात पोलीस उभे असल्याचे पाहताच लल्लू संतापला व घरातून विळा आणून पोलिसांवर हल्ला केला. यात डोक्यावर मार लागल्याने ठाणेदार जखमी झाले, तर पोलीस कर्मचा-यांच्या हातावर मार लागला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यापूर्वीही केला पोलिसांवर हल्ला
लल्लू उर्फ सय्यद कलीम हा वेडसर व्यक्ती म्हणून परिचित आहे. यापूर्वी त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून नागरिकांवर दगड घेऊन धावण्यासह विनाकारण मारहाण करण्याचे आरोप त्याच्यावर आहे. मंजूरपुरा या परिसरात त्याची दहशत पसरली आहे.