अचलपूरचे कोविड रुग्णालय नावापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:29+5:30
कोविड-१९ च्या अनुषंगाने स्थानिक कुटीर रुग्णालयात ३५ बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटमध्ये १० बेडचे कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजनचे पाच बेड असे १५ बेड पाच महिन्यांपूर्वी लावले गेलेत. पण ट्रामा केअरमधील ते कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजन बेड मागील पाच महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. कोरोना संक्रमितांकरिता ते उपलब्ध नाहीत.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक कुटीर रुग्णालयासह ट्रामा केअर युनिटमध्ये उभारलेले डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) केवळ नावालाच आहे. आवश्यक डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह ऑक्सिजन व औषधांअभावी कोरोना संक्रमितांची तेथे हेळसांड होत आहे. अद्ययावत उपचारांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
कोविड-१९ च्या अनुषंगाने स्थानिक कुटीर रुग्णालयात ३५ बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटमध्ये १० बेडचे कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजनचे पाच बेड असे १५ बेड पाच महिन्यांपूर्वी लावले गेलेत. पण ट्रामा केअरमधील ते कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजन बेड मागील पाच महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. कोरोना संक्रमितांकरिता ते उपलब्ध नाहीत. अचलपूर-परतवाड्यासह अचलपूर तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवे रुग्ण निघत आहेत. शहरासह अख्खा तालुकाच हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातही कोविड-१९ विषाणूने ग्रासलेले रुग्ण आढळून येत आहेत. मेळघाटात सुरुवातीला कोरोनाचा गंधही नव्हता. मात्र, आता संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे.
अशातच कोरोना संक्रमितांच्या उपचाराकरिता ५० बेड सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, यातील ट्रामाकेअर मधील १५ बेड कुलूपबंद आहेत. उर्वरित ३५ बेडकरिता दाखल कोरोना संक्रमित रुग्णांपैकी काहींना सरळ अमरावतीला पाठविले जात आहे, तर काही रुग्ण तेथील व्यवस्था व उपचार पद्धती बघून स्वत:हून इतरत्र खासगीत पळ काढत आहेत. काही रुग्ण परस्पर बाहेरूनच इतरत्र पळत आहेत. यात इतरत्र बाहेरही त्यांना तात्काळ बेड उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रूग्णालयात नव्याने २०० बेड
कुटीर आणि ट्रामा केअरमधील ५० बेडलाच आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ, औषधी व व्यवस्थेसह यंत्रणा अपूरी पडत आहे. अशातच अमरावती रोडवरील महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोनशे बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
खासगी रुग्णालय नाही
अचलपूर-परतवाड्यात अनेक तज्ज्ञ खासगी डॉक्टर आहेत. पण, कोरोना संक्रमित रुग्णांवर ते उपचार करायला तयार नाहीत. जुळ्या नगरीत कोरोना संक्रमितांकरिता एकही खासगी रुग्णालय नाही.