पर्यटनासाठी पतंग महोत्सवाची उपलब्धी
By admin | Published: January 16, 2016 12:22 AM2016-01-16T00:22:15+5:302016-01-16T00:22:15+5:30
अमरावती जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त ....
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त येथील सायंस स्कोअर मैदानावर आयोजिलेल्या पतंग महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते झाले. पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक क्षिप्रा बोरा तसेच पंतगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, मकर संक्रांत हा सण संपूर्ण आशिया खंडात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आजपासून सूर्य उत्तरायन होतो असे सांगून ते म्हणाले की, संपूर्ण भारतात सर्वधर्मीय एकत्र येऊन विविध रंगाचे, विविध आकाराचे पतंग आकाशात उडवून अबालवृद्धांसह सर्वच जण पतंगाचा आनंद घेतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सायंस स्कोअर मैदानावर आयोजिलेल्या पतंग महोत्सवास लहान मुलांनी तसेच युवक युवतींनी मोठी गर्दी केली होती. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने भला मोठा पतंग तयार करण्यात आला होता.
पतंग महोत्सव असे लिहिलेला पतंग तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ असे संदेश देणारे व एकाच दोऱ्यात बांधलेल्या ५१ पतंग आकाशात उडवून जिल्हाधिकाऱ्यांनी पतंग महोत्सवाचे उद्घाटन केले. हे सर्व पतंग खाजा पतंगवाला यांनी तयार केले होते. (प्रतिनिधी)