पालकाने स्वखर्चाने टाकला मुरुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:20 AM2019-08-07T01:20:33+5:302019-08-07T01:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पार्वतीनगरातील रस्त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पार्वतीनगरातील रस्त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. शाळकरी मुलांना शाळेत पोहचविताना पालकांची दमछाक होते. वारंवार नगरसेवकांकडे विनंती करून थकलेल्या एका पालकाने चक्क स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकून आपल्या पाल्याच्या शाळेचा मार्ग दुचाकी जाईल इतपत सुकर केला आहे.
पावसामुळे शहरातील अनेक खडतर रस्ते चिखलमय झाल्यामुळे त्यावर चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पार्वतीनगरातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकालाच वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच पार्वतीनगरातील मार्गावर काही शाळा आहेत. शिवलीला मंगल कार्यालयाकडे जाणाºया रस्ता अत्यंत खडतर व मातीमय झाला आहे. त्यामुळे स्कूल व्हॅनचालक मुलांना शाळेत पोहचवून देण्यासाठी आनाकानी करू लागले आहेत. त्यामुळे मुले शाळेतही गैरहजर राहत आहेत. अखेर पालकांवरच मुलांना शाळेत सोडून देण्याची वेळ आली आहे. मात्र, रस्ते इतके खराब आहेत की, त्यावरून दुचाकी नेण्यासही मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मुरुम टाकण्यांबाबत पालकांनी अनेकदा गडगडेश्वर प्रभागातील नगरसेवकांना सांगितले. मात्र, नगरसेवकांनी निगरगट्ट भूमिका घेतली. त्यामुळे अखेर राठोड नामक पालकाने स्वखर्चाने ट्रकभर मुरुम आणून रस्त्यावर टाकला. त्यामुळे आता त्या रस्त्यावरून दुचाकी जाईल, इतकी व्यवस्था झाली आहे. मात्र, अद्याप महापालिका प्रशासन व नगरसेवकांना जाग आलेली नाही. नागरिकांना रात्रीच्या वेळी याच रस्त्यावरून जावे लागत असून, अंधारात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.