एसीपींच्या तक्रार पेट्यांना एकवर्ष पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:08+5:302021-01-10T04:11:08+5:30
जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम अनिल कडू परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून ...
जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम
अनिल कडू
परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून लोकोपयोगी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या साडेतीनशे तक्रार पेट्यांना एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी जिल्हाभर आपल्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या पेट्या वितरित केल्या आहेत. शाळा, महािवद्यालयांसह शहरातील, गावांतील चौकाचौकांत, वर्दळीच्या मोक्याच्या ठिकाणी लावल्या आहेत.
या कुलूपबंद पेट्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात आहेत. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, तक्रारी दुसऱ्यावरील अन्यायाविरुद्धची चीड, पोलीस प्रशासनातील उणीव, पोलिसांची वागणूक अवैध धंद्याची माहिती, त्रास देण्याऱ्यांची नावे, कारवाईबाबतची अपेक्षा आणि गुन्हेगारांसह चिडीमारांची नावे थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचविण्यास या तक्रार पेट्या उपयुक्त ठरल्या आहेत.
या पेट्या लावण्यापूर्वी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, प्रसंगानुरुप नागरिकांशी व पालकांशी संवाद साधला. पेट्यांची उपयुक्तता आणि कार्यपद्धतीबाबत स्वत:ची कार्यपद्धती व भूमिका त्यांनी मांडली. निर्भीडपणे आपल्या तक्रारी, सूचना, या तक्रारपेटीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. निश्चित कार्यवाहीबाबत त्यांनी आश्वस्तही केले. गोपनीयतेची हमीही दिली.
या तक्रारपेट्या उघडून त्यातील तक्रारींची दखल घेण्याकरिता जिल्हास्तरावर एक स्वतंत्र स्कॉडही त्यांनी कार्यन्वित केले. या कुलूपबंद पेट्यांच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवल्यात. दर शनिवारी किंवा ठराविक अवधीनंतर या पेट्या उघडल्या जाऊ लागल्यात. या पेटीतील तक्रारी आणि तक्रारकर्त्यांबाबत गोपनियता बाळगली गेली. अनेक प्रकरणांत पेटीतील तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केल्या गेली. यात या लोकोपयोगी उपक्रमातील या तक्रारपेट्या नागरिकांसह, विद्यार्थी व पालकांना दिलासादायक ठरल्या आहेत.
या पेट्यांची उपयोगिता बघता नागरिक, विद्यार्थी त्या पेट्यांकडे वळले असून, लॉकडाऊनचा अपवाद वगळता आजही त्या पेट्या उघडल्या जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा हा लोकोपयोगी उपक्रम राबविला जात आहे.
जिल्हाभर लावल्या गेलेल्या या तक्रार पेट्यांचे लोकेशनही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. चार-दोन अपवाद वगळता वर्षभरापूर्वी लावलेल्या त्या सर्व तक्रार पेट्या आपआपल्या लोकेशनवर आज ही कायम आहेत. या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक थेट लोकांच्या पाठीशी उभे आहेत.