तिवसा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:32+5:302021-07-01T04:10:32+5:30
--------------------------------------------------------------------------------------------------------- सुसज्ज इमारती, डॉक्टरांची वानवा, प्रमुखच नसल्याने कामकाज वाऱ्यावर तिवसा/सूरज दाहाट अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तालुका मुख्यालयाच्या तिवसा शहरातील ग्रामीण ...
---------------------------------------------------------------------------------------------------------
सुसज्ज इमारती, डॉक्टरांची वानवा, प्रमुखच नसल्याने कामकाज वाऱ्यावर
तिवसा/सूरज दाहाट
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तालुका मुख्यालयाच्या तिवसा शहरातील ग्रामीण रुग्णालयाला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे वर्षभरापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. प्रभारींवर आला दिवस ढकलला जात आहे. तब्बल ११ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचेही रिक्त असल्याने रुग्णालयाचे कामकाज वाऱ्यावर पडल्याची स्थिती येथे आहे.
जुन्या रुग्णालयाची इमारत मोडकळीस आल्याने ना. यशोमती ठाकूर यांनी मोझरी विकास आराखड्यातून तिवसा-सातरगाव रोडवर नवीन सुसज्ज इमारत बांधली. दोन वर्षांपूर्वी येथील नव्या इमारतीत रुग्णालय स्थलांतरित झाले. मात्र, रिक्त पदांचे ग्रहण कायम आहे. या रुग्णालयाला ट्रामा केयर युनिटदेखील मंजूर आहे. मात्र, यंत्रसामग्री उपलब्ध नाही तसेच ती हाताळण्यासाठी डॉक्टर नाहीत. मुख्य म्हणजे, रुग्णालयात २०१० पासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे प्रमुखाविना तब्बल ११ वर्षांपासून येथील कामकाज कसे चालत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. या रुग्णालयाचा सात कंत्राटी डॉक्टर कारभार हाताळतात. एकच नियमित वैद्यकीय अधिकारी आहे. त्यातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ लिपिकाचे प्रत्येक एक, तर कक्षसेवकाची दोन पदे रिक्त आहेत. शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या तीन जागा रिक्त आहेत.
बॉक्स
रुग्णालयात आतापर्यंत १४७३ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. यातील केवळ एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णालयाने कोरोनावर यशस्वी मात करीत अनेकांचे जीव वाचवले. ५० बेडचे कोरोना रुग्णालय जिल्हा प्रशासनाने येथे तयार केले होते.
बॉक्स
तिवसा रुग्णालयाचे सर्व कामकाज प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर पवन मालसुरे हे पाहत होते. काही महिन्यांपूर्वी पवन मालूसरे यांना अमरावती शहर पोलिसांनी रेमडेसिविर काळाबाजारप्रकरणी अटक केली. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार पुन्हा ढेपाळला आहे.
बॉक्स
मनुष्यबळ वाढणार
तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी ना. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने २० पदांना मंजुरी मिळाली असून, तसा शासननिर्णयही निर्गमित झाला आहे, यात वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, शस्त्रक्रिया कक्ष सहायक, औषधी निर्माण अधिकारी, सहायक अधिसेविका, परिसेविका आदी विविध पदांचा समावेश आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊन उपचार यंत्रणा अधिक सुसज्ज होणार आहे.
Attachments area