वर्षभरात ३६ हजार ६५० वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:04 PM2018-12-25T22:04:11+5:302018-12-25T22:05:05+5:30
वाहतूक पोलिसांनी आतापर्यंतच्या ३६० दिवसांत नियम भंग करणाऱ्या तब्बल ३६ हजार ६५० वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय त्याच्याकडून ८१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीतून अमरावतीकरांना नियमांचे भानच नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाहतूक पोलिसांनी आतापर्यंतच्या ३६० दिवसांत नियम भंग करणाऱ्या तब्बल ३६ हजार ६५० वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय त्याच्याकडून ८१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीतून अमरावतीकरांना नियमांचे भानच नसल्याचे दिसून येत आहे.
अमरावती शहरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. या वाढत्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असताना नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणारे पोलीस वाहनचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळले असून, त्यांच्या कारवाईचा प्रभावदेखील या बेशिस्त वाहनचालकांवर पडत नसल्याचे दिसून येत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार १ जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ३६ हजार ६५० वाहनांकडून ८१ लाख ३६ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामध्ये पुढे बसवून प्रवासी वाहतूक करणाºया तब्बल २ हजार २२७ वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. यासोबतच वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणारे १ हजार ४६२ चालक आढळून आले. नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणाºयांची संख्या ११ हजार ६४९ आहे. याशिवाय ११ हजार १०४ वाहनचालकांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या आकडेवारीवरून अमरावती शहरात नियमभंग करणाºया चालकांचे प्रचंड प्रमाण असल्याचे निदर्शनास येत आहे. ३ हजार ८१४ जणांना ट्रिपल सिट वाहन चालविताना पकडण्यात आले, तर वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना २ हजार १३८ वाहनचालक आढळून आले आहेत.
सिमेंट रोडच्या बांधकामामुळे वाहतूक अनियंत्रित
शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोडमुळे एकतर्फी वाहतूक करावी लागत आहे. अशा स्थितीत जिकडे मार्ग मिळेल, त्या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. यात विरुद्ध दिशेने वाहतूक वाढली असून, नियम भंग करीत वाहने चालविली जात आहेत. सिमेंट रोडच्या बांधकामामुळे शहरातील वाहतूक अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबरच्या २४ दिवसात ७ हजार २०८ प्रकरणे
वाहतूक पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियमभंग करणाºया वाहनांवर कारवाईसाठी कंबर कसली. गेल्या २४ दिवसांमध्ये तब्बल ७ हजार २०८ वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्षभरात डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच सर्वाधिक कारवाई करण्यात आली.
या आहेत सर्वात कमी कारवाया
भरधाव वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध वर्षभरात चार कारवाया झाल्या. गणवेशावर बॅच न लावणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहनांवर अतिक्षमतेचे भोंगे, असुरक्षित मालवाहतूक असे एकही वाहन आढळले नाही. विनानोंदणी दोनच वाहने वर्षभरात आढळली. बिगर फिटनेसच्या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
अशी आहे कारवाईची आकडेवारी
वर्षभरात ८९ वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने वाहन चालविले. प्रवेश बंदचे उल्लंघन करणारे २३९, विनापरवाना वाहन चालविणारे २७३, बेकायेदशीर प्रवासी वाहतूक करणारे ७०, अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करणारे ४४९, गणेवश न घालणारे ३०४, नो-एन्ट्रीवर प्रवासी बसविणारे १२, रस्त्यात आॅटो उभे करणारे ३०८, कॉर्नरवर आॅटो उभे करणारे ३५३, आॅटो रस्त्यावर उभे करणारे ३९४, आम रस्त्यावर वाहन उभे करणारे ५१६, वाहने साइडला किंवा माल बाहेर निघेल अशा पद्धतीने भरणारे ५५८, विना क्रमाकांची दुचाकी चालविणारे ८६, चारचाकीचे २५२, कर्कश्श हार्न वाजविणारे ७१, डार्क ग्लास लावणारे २२, वाहनावर एल बोर्ड लावणारे २४, विनापरवानगी जनावरांची वाहतूक करणारे ४७, रात्रीच्या वेळी विनालाइट वाहने चालविणारे ६, विनाविमा वाहन चालविणारे ९, सिट बेल्ट न लावणारे १०५ वाहनचालक आहेत.