थर्टी फर्स्टला उल्लंघन करणाऱ्या ४२१ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:42+5:302021-01-02T04:11:42+5:30
(फोटो आहे. ) अमरावती : शहरात ४१ ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले होते. यामध्ये ‘थर्टी फर्स्ट’ला वाहतूक नियमांचे ...
(फोटो आहे. )
अमरावती : शहरात ४१ ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले होते. यामध्ये ‘थर्टी फर्स्ट’ला वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ४२१ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून ३५ हजारांपेक्षा जास्त दंडसुद्धा वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रस्त्यावर उतरून नियम मोडणाऱ्यांना धडा शिकविला. त्यांनी सर्व नाकाबंदी पाॅईंटला भेटी देऊन पाहणी केली. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबधित ठाणेदारांना दिले होते. त्या स्वत: रस्त्यावर उतरल्यामुळे प्रत्येक ठाण्याचे पोलीस निरीक्षक अलर्ट झाले होते.
बंदोबस्तादरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हच्या २२ कारवाया करण्यात आल्या, तर भादंविचे कलम १८८ अन्वये १८ गुन्हे नोंदविण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत पाच प्रकरणे नोंदविल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली. गुरुवारी शहरात रात्री ९ वाजतानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पंचवटी चौक, राजकमल चौक, इर्विन चौक, शेगाव नाका, कठोरा नाका, वेलकम पॉईंट , वलगाव, भातकुली यांसह ४१ ठिकाणी फिक्स पाॅईंट निश्चित करण्यात आले होते. गाडगेनगर ते क्रीडा संकुल तसेच इर्विन चौक ते राजापेठकडे उतरणारा उड्डाणपूल वाहतुकीस पहाटे ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता.
बॉक्स:
हुल्लडबाज तरुणांची तपासणी
नाकाबंदीदरम्यान शहरात रात्री १० वाजतानंतर दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात आली. भरधाव वाहन तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. गुरुवारी पहाटे ४ पर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. पोलीस आयुक्त आरती सिंह, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव तसेच तिन्ही सहायक आयुक्तांनी शहरात फिक्स पाॅईंटला भेटी देऊन पाहणी केली. प्रभारी सहायक आयुक्त (वाहतूक) राहुल आठवले यांनीसुद्धा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची झडती घेतली.