२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:51+5:30

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात.

Action on 450 testers for 25% marks | २५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देपाच हजारांचा दंड, सेवापुस्तिकेत नोंद : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्के गुणवाढ होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली असून, प्रतिपरीक्षक पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ‘अंडर व्हॅल्यूएशन आणि ओव्हर व्हॅल्यूएशन’ अंतर्गत पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांची २५ टक्के गुणवाढ झाल्यास अशा परीक्षकांवर पाच हजार रुपये दंड आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबत नोंद करण्याला सुरुवात केली आहे. हिवाळी २०१८ परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित सोडविले असताना, गुण कमी अथवा नापास का झालो, ही विचारणा करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्याकडे एकच गर्दी केली होती.
विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायापत्र घेण्याची संधी आहे. त्यावरून हिवाळी २०१८ परीक्षेत २४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ६२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के गुणवाढ मिळाली होती. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मूल्यांकनात दिरंगाई आणि दुर्लक्षाचा ठपका ठेवत प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई होणार आहे. संबंधित परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याप्रकरणी कायद्यानुसार ४५० परीक्षकांना कारवाईची नोटीस पाठविली आहे. पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद असे त्याचे स्वरूप आहे.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

Web Title: Action on 450 testers for 25% marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.