पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर ‘अॅक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:31+5:30
अमरावती शहरातील अवैध दारू, गुटखा हद्दपार करा, पोलिसांचा धाक असायला हवा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, सायंकाळपासूनच कामाला लागा, असे सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित केले होते. त्यांच्या आदेशावर अंमलबजावणी शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस विभागाने सोमवारी सायंकाळपासूनच कारावायांचा सपाटा सुरु केला. शहरात दारूबंदी कायद्यान्वये २५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीसंदर्भात पोलीस उपायुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाण्यांना सूचना दिल्या आहेत.
अमरावती शहरातील अवैध दारू, गुटखा हद्दपार करा, पोलिसांचा धाक असायला हवा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, सायंकाळपासूनच कामाला लागा, असे सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित केले होते. त्यांच्या आदेशावर अंमलबजावणी शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच सुरू केली. शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारूविक्रीवर धाडसत्र सुरू करण्यात आले आहेत. सोमवारी तब्बल १५ ठिकाणी धाडी टाकून आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. त्याचप्रमाणे मंगळवारी उशिरापर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा सपाटा सुरूच होता. याशिवाय पोलीस उपायुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तडीपारांच्या तपासणीचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेनेही आपली कंबर कसली असून, नियमबाह्य वाहतुकीवर कारवाईचे सत्र मंगळवारी दिवसभर राबविण्यात आले.
वाहतूक पोलिसांकडून २०० कारवाया
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वाहतूक समस्येवर फोकस करून वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार नो-पार्किंग, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे आदी नियमभंगप्रकरणी तब्बल २०० वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या एफडीएला सूचना
एफडीएला गुटखासंबंधी कारवाईसाठी मनुष्यबळ पुरविण्यात येईल, असे पोलीस विभागाने सुचविले आहे. त्यामुळे आता पोलीस संरक्षणात यासंबंधी कारवाईचा सपाटा सुरू केला जाणार आहे.