बडनेऱ्यात रूळ ओलांडणाऱ्या ४० जणांविरुद्ध कारवाई
By admin | Published: November 10, 2016 12:06 AM2016-11-10T00:06:58+5:302016-11-10T00:06:58+5:30
रेल्व रूळ ओलांडून ये-जा करणे, हा कायदेशीर गुन्हा असतानाही काही प्रवासी अती घाई करून गाडी येण्याची चिन्हे असूनही रेल्वे रूळ ओलांडतात.
प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड : रेल्वे सुरक्षा दलाची धडक मोहीम
अमरावती : रेल्व रूळ ओलांडून ये-जा करणे, हा कायदेशीर गुन्हा असतानाही काही प्रवासी अती घाई करून गाडी येण्याची चिन्हे असूनही रेल्वे रूळ ओलांडतात. बडनेरा रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशांविरुद्ध बुधवारी धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. यात रेल्वे सुरक्षा दलाने ४० जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. याबाबतचे बोेलके छायाचित्र लोकमतने प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली
रेल्वे क्रॉसींगचा मुद्दा काही वर्षांपूर्वी लोकसभेत गाजला होता. त्यानंतर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरूद्ध रेल्वे कायद्यानुसार १४७ अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
-आता निरंतर कारवाई
अमरावती :या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली. मात्र, तोकड्या मुनष्यबळामुळे रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करणे शक्य नव्हते. मात्र, ही बाब ‘लोकमत’ने बोलक्या छायाचित्राच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सी.एस. पटेल यांच्या नेतृत्वात धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्याप्रवाशांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली. बुधवारी सकाळपासूनच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्यांवर पाळत ठेऊन होते. रेल्वे रूळ ओलांडताच प्रवाशांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. एक, दोन असे निरंतर प्रवासी ताब्यात घेणे सुरु असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एकूण ४० प्रवाशांविरुद्ध कारवाई केली. रेल्वे कायद्यानुसार कलम १४७ अंतर्गत ५०० रूपये दंड अथवा तुरूंगात रवानगी असे दोन पर्याय उपलब्ध होते. यात रेल्वे क्रॉसिंग करताना पकडण्यात आलेल्या ४० प्रवाशांनी दंडाची रक्कम भरून तुरुंगात जाण्यापासून सुटका केली. या धडक कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक सोबरसिंह, जमादार विठोबा मरसकोल्हे, आर. के. मिश्रा, शेरखान यांनी मोलाची कामगिरी बजावली.
रेल्वे क्रॉसिंग करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे. ही कारवाई निरतंरपणे सुरुच राहते. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करु नये, असा संदेश आठवडा किंवा महिन्यातून विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाईतून दिला जातो. परंतु आता ही कारवाई सलग सुरु राहिल.
- सी.एस.पटेल
निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल बडनेरा.